NEET UG 2022 Registration : नीट यूजी परीक्षेसाठी (NEET UG 2022) अर्ज भरण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. आता परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक उमेदवार 20 मेपर्यंत अर्ज करु शकतात. यापूर्वी अर्ज भरण्याची तारीख 15 मेपर्यंत देण्यात आली होती. दरम्यान, जे विद्यार्थी NEET UG 2022 परीक्षेला बसण्यासाठी इच्छुक आहेत आणि ज्यांनी अद्याप परीक्षेसाठीचा अर्ज दाखल केला नसेल, त्यांच्यासाठी ही शेवटची संधी असेल. अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वर जाऊन विद्यार्थी आपला अर्ज दाखल करु शकतात. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा 17 जुलै रोजी 543 शहरांमध्ये घेतली जाणार आहे. परीक्षेचं आयोजन 13 भाषांमध्ये केलं जाणार आहे. अशातच, या परीक्षेसाठी आतापर्यंत 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. अशातच आता नीट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. 


अर्ज शुल्क 


नीट यूजी (NEET UG) परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या, सामान्य श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 1600 रुपये आणि जनरल-EWS, OBC-NCL श्रेणीतील उमेदवारांसाठी 1500 रुपये भरावे लागतील. तसेच, SC, ST, PWBD आणि तृतीय लिंग उमेदवारांसाठी फी 900 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 


कोणत्या शहरांमध्ये आयोजित होणार परीक्षा? 


एमबीबीएस, बीडीएस, आयुष पदवी, बीएससी नर्सिंग, बीएससी लाइफ सायन्सेस आणि पशुवैद्यकीय अभ्यासक्रम यांसारख्या पदवीपूर्व वैद्यकीय आणि संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी NEET परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत एकूण 200 प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी 200 मिनिटांचा वेळ दिला जाईल. एकूण 543 शहरांमध्ये ही परीक्षा होणार असून त्यापैकी 14 शहरं भारताबाहेरील आहेत.


90 हजार एमबीबीएस जागांसाठी परीक्षा 


रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या वर्षी भारतात एमबीबीएसच्या 90,825 जागांसाठी नीट प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासोबतच बीडीएसच्या 27,948, आयुषसाठी 52,720, बीएससी नर्सिंगसाठी 487 आणि बीव्हीएससीसाठी 603 जागांसाठी NEET परीक्षा घेतली जाणार आहे. 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI