मुंबई : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर (Maharashtra HSC Results 2020 Declared) झाला. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता संपली. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल पाहू शकतात. राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता.


आता निकाल तर लागला आहे. मात्र या निकालावर अनेक विद्यार्थी समाधानी असू शकत नाहीत. जर अशा विद्यार्थ्यांना आपली उत्तरपत्रिकेची झेरॉक्स प्रत हवी असेल किंवा मार्कांचं रिचेकिंग करायला अर्ज करायचा असेल तर त्यांनी काय करायचं? असा सवाल उपस्थित होऊ शकतो. यासाठी नेमकं काय करायचं? हे जाणून घेऊयात.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे आणि पुनर्मूल्यांकनासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन अर्ज करावे लागत होते. पण आता या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ही प्रक्रिया सुरु केली जाईल.

बारावीचे विद्यार्थी http://verification.mh-hsc.ac.in या वेबसाईटवरुन अर्ज करु शकतील. या अर्जासाठी लागणारी फी सुद्धा आॅनलाईन भरावी लागेल. 16 जुलैला बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर 17 जुलैपासून बारावीचे विद्यार्थी या वेबसाईटवरुन अर्ज दाखल करु शकणार आहेत.

Maharashtra HSC Results | बारावीचा निकाल जाहीर, इथं पाहा रिझल्ट

कोकण विभाग टॉपवर तर औरंगाबाद सर्वात कमी

सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 95.89 टक्के निकाल असून सर्वात कमी निकाल औरंगाबाद विभागाचा (88.18 टक्के) आहे.

विभागनिहाय निकाल
कोकण - 95.89
पुणे - 92.50
कोल्हापूर -92.42
अमरावती - 92.09
नागपूर - 91.65
लातूर - 89.79
मुंबई - 89.35
नाशिक - 88.87
औरंगाबाद - 88.18

या परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएसची व्होकेशनल या शाखांमधील एकूण 14, 20, 575 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14, 13, 687 विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले. त्यापैकी 12, 81, 712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 90.66 टक्के आहे.

निकालात मुलींचीच बाजी

बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 93.88 टक्के असून विद्यार्थ्यांचा निकाल 88.04 टक्के आहे. म्हणजेच विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 5.84 टक्क्यांनी जास्त आहे. या परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधील एकूण 86, 739 विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 86, 341 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामधील 33, 703 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 39.03 टक्के आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.57 टक्के लागला आहे.

26 विषयांचा निकाल 100 टक्के

बारावीसाठी एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली, त्यामध्ये 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. बारावीच्या निकालात शाखानिहाय नजर टाकली असता विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला आहे. विज्ञान शाखा निकाल 96.93 टक्के लागला आहे. तर कला शाखेचा निकाल 82.63 टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 91.27 टक्के लागला आहे.

Education Loan Information:

Calculate Education Loan EMI