मुंबई : सीईटी परीक्षेमध्ये सर्व्हर डाऊन झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. बोरिवली सीईटी परीक्षेच्या सेंटरमध्ये हा गोंधळ झाल्याने तब्बल 300 विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. इंजिनिअरिंगची ही सीईटी परीक्षा आज होत आहे. दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत त्यांचं नुकसान न होऊ देता त्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येईल असं सीईटीचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. 


आज सकाळी 9 ते 11 च्या दरम्यान परीक्षेचा पहिला टप्पा होणार होता तर दुसरा टप्पा हा दुपारी 2 ते 4 असा होणार होता. सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांची सर्व्हर डाऊन झाल्याने परीक्षा होऊ शकली नाही. तर दुपारच्या विद्यार्थ्यांनाही अद्याप ताटकळत रहावं लागलंय. त्यामुळे आपली परीक्षा होणार आहे की नाही, की ती पुढे ढकलली जाणार आहे हे या विद्यार्थ्यांना अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 


या आधीही अनेकदा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. लॉ परीक्षेमध्येही सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली होती. इंजिनिअरिंगची सीईटी परीक्षा ही विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्त्वाची असते, कारण त्याच आधारावर विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होतात. आताही ही परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं याच्या कोणत्याही सूचना परीक्षा केंद्राने अद्याप दिलेल्या नाहीत. 


परीक्षा पुन्हा होणार, सीईटी आयुक्तांची माहिती
हा सर्व्हरची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता पण तो सुटला नाही. पण या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, या विद्यार्थ्यांनी चिंता करू नये. या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे असं सीईटी आयुक्त रविंद्र जगताप यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. या संबंधित माहिती सीईटीच्या वेबसाईटवर देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी त्यावर भेट देऊन माहिती घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे.


दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून सर्व्हरची समस्या सुटल्यास त्यांची परीक्षा आताच होईल. तसं न झाल्यात या परीक्षा 26 ऑगस्टनंतर पुन्हा घेण्यात येतील असंही रविंद्र जगताप यांनी स्पष्ट केलं. 


महत्त्वाच्या बातम्या: 



 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI