मुंबई : जून शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी दहावी नंतरच्या महाविद्यालयीन (College) प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान / वास्तुकला या पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया दिनांक 20 मे 2025 पासून सुरु झालेली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची 26 जूनपर्यंत मुदत होती. प्रवेश प्रक्रियेसाठी मिळणारा उत्तम प्रतिसाद पाहता, अभियांत्रिकी पदविका प्रवेश अर्ज नोंदणीची पुन्हा मुदतवाढ 30 जुन 2025 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी दिली. मंत्री पाटील म्हणाले की, पुढील संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक तंत्र शिक्षण संचालनालयाद्वारे जाहीर करण्यात आले आहे. 26 जून 2025 रोजी संध्याकाळ पर्यंत तब्बल 1लाख 50 हजार 684 विद्यार्थ्यांनी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज नोंदणी केलेली आहे, तर त्यापैकी 1 लाख 30 हजार 885 विद्यार्थ्यांनी शुल्क भरणा केले आहेत.

Continues below advertisement

या वर्षी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत (कॅप) प्रवेशाच्या चार फेऱ्या घेण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी पहिला विकल्प, दुसऱ्या फेरीसाठी पहिले तीन विकल्प, तिसऱ्या फेरीसाठी पहिले सहा विकल्प तर चौथ्या फेरीसाठी सर्व विकल्प अनिवार्य असणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कॅप फेरीसाठी विकल्प अर्ज भरुन केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घ्यावा, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.

दहावीचा निकाल जाहीर होताच तंत्रशिक्षण संचालनालयाने पॉलिटेक्निक प्रवेशाचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले. दहावीनंतर कमी कालावधीत तंत्रशिक्षण घेऊन अभियंता होण्यासाठी तंत्रशिक्षणातील पदविका अभ्यासक्रम हा एक उत्तम पर्याय आहे. हा पदविका अभ्यासक्रम 10 वी नंतर तीन वर्षांचा असतो व हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होतात. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना पात्रतेच्या निकषानुसार विविध शिष्यवृत्ती शासनातर्फे देण्यात येते. पदविका शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या थेट द्वितीय वर्षात पात्रतेनुसार प्रवेश घेण्याची संधीही उपलब्ध असते.

Continues below advertisement

मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमातून अध्यापनाचा पर्याय निवडक पॉलिटेक्निकमध्ये उपलब्ध आहे. सभोवतालच्या औद्योगिक क्षेत्रांमधील आवश्यक गरजा ओळखून पॉलिटेक्निकमध्ये न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी संबंधित सध्या मागणी असलेले नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम जसे की आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, रोबोटिक्स इ. असे अभ्यासक्रम सुरु केले गेले आहेत. विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी विविध कंपन्यांसोबत संचालनालयाने सामंजस्य करार केले आहेत. राज्यातील तंत्रनिकेतनांचे मॉनिटरिंग, अभ्यासक्रम, परीक्षा यावर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत देखरेख केली जाते. मंडळामार्फत नवीन K-Scheme राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना 12 आठवड्यांचे अनिवार्य प्रशिक्षण देखील देण्यात येते. तसेच मंडळामार्फत राज्यात सर्वत्र पदविका अभ्यासक्रमाचा दर्जा उत्तम व एकसमान राखला जातो. तंत्र शिक्षणामध्ये घडवून आणलेल्या सकारात्मक बदलामुळे पदविका प्राप्त विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रामध्ये विद्यावेतनासह प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होत आहेत.

पदविका प्रवेशासाठी सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, प्रवेशासंबंधीची माहिती घेण्यासाठी तसेच नाव नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी dte.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

आणीबाणीत वर्तमानपत्र बंद पाडणाऱ्या शंकररावांचा मुलगा आज भाजपात; संजय राऊतांचा पलटवार


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI