महाराष्ट्राच्या मातीतील एक द्रष्टा राजा म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील रत्न, राजर्षी छत्रपती शाहू महाराज! ज्यांनी फक्त गादीची माळ गळ्यात घातली नाही, तर जनतेच्या दुःख-दैन्यांची जबाबदारीही पेलली. शोषितांच्या आयुष्यात प्रकाश फेकणारा, शिक्षणाच्या द्वारात सर्वांसाठी समान प्रवेश देणारा, आणि माणुसकीच्या झेंड्याला अभिमानाने फडकवणारा हा एक राजा – लोकहितवादी राजा!

Continues below advertisement


राजर्षी शाहू महाराजांचा 26 जून हा जन्म दिवस 'सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात. राजर्षि शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा हा केवळ इतिहास नाही तर तो भविष्याचा वेध घेणारा विचार आहे. राजर्षि शाहू महाराज यांच्या कालखंडाकडे पाहताना त्यांनी केलेल्या कार्याचे आजही महत्त्व लक्षात येते.


देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक,धार्मिक, शैक्षणिक, आदी क्षेत्राला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. 1902 चा आरक्षणाचा निर्णय, 1907 चा सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी, कुस्तीकलेच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न, भारतातील पहिले कुस्तीसाठीचे खासबाग मैदान, शेतीच्या पाण्याच्या सोयीसाठी धरणाची उभारणी, शेतमालावर प्रक्रिया करण्यासाठी सूतगिरणीची उभारणी, नवीन पीकरचना, चहा-कॉफीच्या मळ्यांचा प्रयोग, धार्मिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीविरुद्धचा संघर्ष, नव्या धर्मपीठाची स्थापना, व्यापार-उद्योगासाठी बाजारपेठांची उभारणी, असे असंख्य निर्णय सांगता येतील. जे राजर्षी शाहू महाराज यांनी अखंड भारताच्या इतिहासात प्रथमच केले. असे धोरण आणि निर्णघेणारे राजे खूपच दुर्मीळ होते. त्यात राजर्षी शाहूमहाराज यांचे सर्वोच्च स्थान होते.


राजर्षी शाहू महाराज यांचा दृष्टिकोन हा जागतिक होता. तो प्रगल्भ होता, पुरोगामी होता. समाजातील समस्यांचे आकलन करून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचा विचार त्यात होता. एखाद्या छोट्या प्रसंगातून समाजाची रित, परंपरा, त्यातील अंधश्रद्धा, अडचणी ते जाणून घेत आणि त्यावर केलेली उपाययोजना आज शंभर वर्षांनंतरही लागू पडते, असे विचारमंथन करणारे राजर्षी शाहू महाराज घडले कसे? हे संस्कार त्यांच्यावर कोणत्या प्रकारच्या शिक्षणातून झाले? याचे विश्लेषण केले तर माणूस राज्यकर्ता म्हणून तयार होताना तो कसा असावा, याचे विवेचन समोर येऊ शकते. आजचे राज्यकर्ते असा विचार करीत नाहीत, म्हणून समाजाच्या प्रश्नांवर कायमस्वरुपी उपाययोजना होत नाहीत. 


राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य प्रचंड आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. 1919 साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करुन विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी इ.स. 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरुन झालेला वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्याच काळात झाला.


'शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी 'किंग एडवर्ड अॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले.त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना 'राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली.


छत्रपती शाहू महाराजांना 'राजर्षी' ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. राजीं शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यातला. आज शाहूंची जयंती. महाराजानी सुमारे 28 वर्षे राज्यकारभार केला. राजर्षी शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी फार तळमळ होती. कारण माणसाला पशुत्वापासून मनुष्यत्व मिळवून देणारे एक प्रभावी अस्त्र म्हणजे शिक्षण होय. त्यामुळे शिक्षणाशिवाय आपला उध्दार होणार नाही. हे राजींनी ओळखले होते. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. एवढेच नाही तर 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळांची निर्मित केली. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.


अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत 1919 मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार् या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणावयाचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून  6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करुन विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.


जातीभेदाचे प्रस्त नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशर मान्यता दिली. तसा कायदा पारित केला आणि याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. एवढेच नव्हे तर संस्थानात जवळजवळ 100 मराठा धनगर विवाह घडवून आणले. 


एकंदरीतच राजकारणाच्या सिंहासनावर बसून समाजकारण घडवणारा राजा… असा विरळच असतो! छत्रपती शाहू महाराज हे केवळ इतिहासाचे पान नव्हते, तर सामाजिक न्यायाचं वटवृक्ष होते. आजच्या पिढीने त्यांचा वारसा केवळ गौरवाने मिरवायचा नाही, तर कृतीतून जपायचा आहे. शिक्षण, समानता, आणि संधी – ही त्यांच्या विचारांची शिदोरी आपल्या हृदयात ठेवूया… आणि त्यांच्या धगधगत्या ज्वालेपासून आपणही एक चैतन्यवंत ठिणगी होऊया! कारण, समाज घडवण्यासाठी राजा लागतोच असं नाही – शाहू महाराजांसारखं विचारांचं नेतृत्व जपलं, की प्रत्येक माणूस स्वतः एक दीपस्तंभ होऊ शकतो!"