मुंबई : शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’ अंतर्गत 25 टक्के (RTE)आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस शुक्रवार 17 मे 2024 पासून प्रारंभ झाला आहे. ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत शुक्रवार, 31 मे 2024 पर्यंत असणार आहे. तत्पूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. यापूर्वी ऑनलाईन पद्धधतीने अर्ज केला असला तरी त्याचा या प्रवेश प्रक्रियेत विचार केला जाणार नाही. पालकांनी नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे, असे देखील  शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
   
आरटीई अंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत 25 टक्के आरक्षित कोट्यातून विनामूल्य  प्रवेश दिले जातात. त्यानुसार, मुंबईतील 319 पात्र शाळांमधील आरटीईच्या 25 टक्के मोफत प्रवेशासाठी 5,670 जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना महाराष्ट्र शासनाच्या https://student.maharashtra.gov.in/adm_portal (www नाही) या संकेत स्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येतील.  
 

  
यापूर्वी सन 2024 -2025 या वर्षाकरिता ‘आरटीई’ 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. तथापि, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली. त्यामुळे यापूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला असला तरी बालकांच्या पालकांनी नव्याने प्रवेश अर्ज करणे बंधनकारक आहे. या पूर्वी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाचा सन 2024-25 या वर्षाच्या सुधारित आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नसल्याचे  बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे. 
      
सुधारित प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन आज (दिनांक 17 मे 2024) पासून पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली.


आरटीई अंतर्गत दुसऱ्यांदा प्रवेश घेता येणार नाही-


ज्या बालकांनी यापूर्वीच आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेश घेतला आहे, अशा बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या student.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक व खासगी प्राथमिक शाळा विभाग) राजू तडवी यांनी केले आहे.


हेही वाचा


RTE Admission : आरटीईच्या एक लाख जागांवरील प्रवेशासाठी नोंदणी कधी सुरु होणार? शालेय शिक्षण विभागाकडून मोठी अपडेट


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI