Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील पुसद (Pusad) इथे 2009 मध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान उसळलेल्या दंगलीप्रकरणी (Riot) तीन दोषींना पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. पुसद अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. इम्रान खान अस्लम खान, आरिफ खान निसार खान, शेख निसार शेख नजुल्ला अशी शिक्षा झालेल्या दोषींची नावं आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेतील अन्य सात आरोपी अजूनही फरार आहेत.


पुसद शहरात 3 एप्रिल 2009 मध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दंगल उसळली होती. या दंगलीची राज्यभर चर्चा झाली होती. त्यावेळी जगदीश जाधव यांच्यावर टोळक्याकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या दंगलीनंतर पुसदमध्ये दहा दिवसांपेक्षा जास्त काळ संचारबंदी लावण्यात आली होती. पुसदमधील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी फार मोठा अवधी लागला होता. या प्रकरणाच्या निकालाकडे पुसदवासियांचं लक्ष लागलं होतं.


जगदीश जाधव यांचे भाऊ अॅड. भरत जाधव यांच्या तक्रारीनंतर दंगल भडकवणाऱ्यांविरोधात आर्म्स अॅक्टसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन एच मखरे यांनी दोषींना पाच वर्षांच्या कारावासासह 25 हजार रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात एक वर्षाची सक्तमजुरी आणि पाच वर्षांचा दंड ठोठवला आहे. दंडाची रक्कम भरली नाही तर दोन महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय तिसऱ्या गुन्ह्यात एक वर्षाचा कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड तसचं चौथ्या गुन्ह्यात एक वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.


दंगल कशी घडली?
3 एप्रिल 2009 मध्ये पुसद शहरात रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात दंगल उसळली होती. यावेळी जगदीश जाधव हे दुचारीने गुजरी चौकातून हनुमान वॉर्डमधील आपल्या घरी जात होते. ज्ञानेश्व मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आरोपी इम्रानखान अस्लम खान, आरीफ खान निसार खान, शेख निसार उर्फ जब्बार खान उर्फ शेके शेख नजुल्ला, शेख निसार फ्रूटवाला शेख हमजा, अतिक अहमद मुश्ताक अहमद, सय्यद महफुस उर्फ टेलर सय्यद रझ्झाक, अब्दुल निसार उर्फ राजू नजर खान, फिरोज खान जाहेद खान, अब्दुल मोबीन अब्दुल सुलतान, रिझवान कुदुस चाबीवाला हे आहाळे चौकातून हातात तलवार आणि रॉड घेऊन पोहोचले होते. यानंतर आरोपींनी जगदीशवर हल्ला केला. हल्ल्यात जगदीश जाधव गंभीर जखमी झाले. यावेळी जगदीश यांना वाचवण्यासाठी त्यांचे भाऊ भरत जाधव धावून आले. परंतु हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न केला. यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी जखमीला रुग्णालयात दाखल केलं. नंतर त्यांना नांदेडमधील रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं. परंतु प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पु्ण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


दोषींविरोधात न्यायालयात आरोपपत्र
जखमी जगदीश जाधव यांचे भाऊ अॅड. भरत जाधव यांच्या तक्रारीनंतर पुसद शहर पोलिसांत दंगलखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी इम्रान खान अस्लम खान, आरिफ खान निसार खान, शेख निसार शेख नजुल्ला या तिघांना अटक केली. तर अन्य सात आरोपी फरार झाल्याने त्यांच्याशिवाय आरोपपत्र दाखल करण्यात आलं. सुरेश जाधव, पी डी इटनारे, आय एफ पठाण यांनी प्राथमिक तपास केला. तर पोलीस उपनिरीक्षक पी एम माकोडे यांनी संपूर्ण तपास करुन न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं.


12 साक्षीदारांचे जबाब
अतिरिक्त सरकारी वकील अॅड. रवी रुपुरकर यांनी 12 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. यामध्ये जखमी जगदीश जाधव, अॅड. भरत जाधव यांच्यासह जखमीवर प्रथमोपचार करणारे डॉ. अमोल मालपाणी, नांदेडचे डॉ. मनीष देशपांडे आणि पुण्यातील डॉ. चेतन प्रधान, तपास अधिकारी आणि पंच यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य समजून पुराव्यांच्या आधारे दंगलखोरांना जगदीश जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची बाब सिद्ध झाली. यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्ययााधी एन एच मखरे यांनी दोषींना दंडासह कारावासाची शिक्षा सुनावली.