Yavatmal Crime News: पैनगंगा नदीपात्रात रस्त्याच्या कारणावरून वाळू तस्करांच्या (Sand Mafia Attack) दोन गटात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना यवतमाळच्या (Yavatmal Crime) महागाव तालुक्यातील भोसा परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घडलीय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत जलद गतीने तपास सुरू केला असता, या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून इतर 25 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या अंदाधुंद गोळीबारात (Firing) कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाच्या अधिक तपास करत आहे. मात्र, जिल्ह्यात आचारसंहिता लागू असतांना या  रिव्हॉल्व्हर आल्या कुठून, हा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.


वाळू तस्करांच्या दोन गटात अंदाधुंद गोळीबार


राज्यात एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून निवडणुकांच्या दुसऱ्या टप्पातील आचारसंहिता कालपासून लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र पोलीस यंत्रणेसह सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. असे असतांना यवतमाळच्या पैनगंगा नदीपात्रात वाळू तस्करांच्या दोन गटात अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर यवतमाळ पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आली असून या प्रकरणी 4 संशयितांना अटक केली असून इतर 25 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार वाळू तस्करांच्या दोन गटात सुरू असलेल्या रस्त्याच्या कारणावरून हा गोळीबार करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. मात्र दोन गटात असलेल्या जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी रेती तस्करांनी गोळीबार केल्याचीही माहीती समोर आली आहे. 


आचारसंहितेत रिव्हॉल्व्हर आल्या कुठून?


घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक, दारव्हा आणि उमरखेड उपविभागीय पोलीस  तसेच इतर अधिकाऱ्यांसह  आर्णी-महागांव पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत प्रकारणाचा तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांना घटनास्थळी चार रिकामे काडतूस आणि दोन जिवंत काढतूस आढळून आले. सोबतच या प्रकरणी दोन्ही गटातील अज्ञातांनी  एक स्विफ्ट डिझायर, टिप्पर आणि इतर वाहनांची मोठी तोडफोड देखील केली आहे. बोळीबार झाल्यानंतर अनेकांनी घटनास्थळावरुन पळ काढला असून त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. मात्र, आचारसंहितेत रिव्हॉल्व्हर आल्या कुठून, हा प्रश्न या निमित्याने उपस्थित करण्यात आला आहे. सोबतच या घटनेनंतर महसूल विभागाकडून हे वादग्रस्त रेती घाट आता सील करणार का या कडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या