Umesh Kolhe Case : अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आज अमरावतीत भाजपसह विविध संघटनेने श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामुळे शहरात उदयपूर सारखी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी सकाळीच शहरातून मोठा रूटमार्च काढला आणि शहरात विविध चौकात बंदोबस्त लावला होता. यावेळी पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर ठेवली होती. दरम्यान, आज याप्रकरणी अमरावतीत आज काय-काय घडलं, हे जाणून घेणार आहोत.
अमरावती येथील उमेश कोल्हे यांची सुनियोजित हत्या करण्यात आली. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता आज सकाळी 11 वाजता अमरावतीच्या राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने अमरावती करांकडून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी भाजप, विहिप, बजरंग दल व्यापारी आणि अमरावतीकर सोबतच अनेक संघटनेचे कार्यकर्ते हजर होते. यावेळी कोल्हे कुटुंबातील सदस्य प्रामुख्याने हजर होते.
यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त होता. पोलिसांनी या कार्यक्रमावर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली होती. विशेष म्हणजे यावेळी श्रद्धांजली होण्यापूर्वीच पोलिसांनी भाजपच्या पाच जणांना डिटेन केल्याने भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी पोलीस आयुक्तांशी त्यांनी चर्चा केली तेव्हा सगळ्यांना सोडण्यात आले.
यावेळी खासदार डॉ अनिल बोंडे यांनी सांगितले की, उमेश कोल्हे यांच्या हत्येमुळे अमरावती शहरातील जनता भयभीत आहे. अमरावती भयमुक्त व्हावी, अवैध धंद्यावर अंकुश राहावा, महिलांना भयमुक्त जगता यावं. 21 जूनला हत्या झाली मात्र आरोपींनी उद्देश सांगितला नाही. 10 दिवस हे प्रकरण पोलिसांकडून दडपण्यात आलं, कोल्हे कुटुंबावर दबाव आणण्यात आला असं ते म्हणाले आहेत.
उमेश कोल्हे हत्येचा तपास हे NIA कडे द्यावा ही सर्वात आधी मागणी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली होती. त्यांना सुरुवातीपासून ह्या हत्येत नुपूर शर्मा यांची काही पोस्ट व्हायरल करल्यानेच झाली, असा अंदाज त्यांना होता आणि अखेर तेच झालं.
तर दुसरीकडे पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांनी सांगितले की, अमरावती येथील उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आम्ही सुरुवातीपासून या केसचा बारकाईने तपास करत होतो. अमरावती शहराची परिस्थिती पाहून आणि संपूर्ण सगळे पुरावे हाती आल्यावर आम्ही माहिती दिली. खासदार नवनीत राणा यांनी लावलेले आरोप हे खोटे आहे. आम्ही सर्व पुरावे मिळाल्या शिवाय माहिती दिली नाही. शहरातील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे..
उमेश कोल्हे हत्या प्रकरणी अटकेत असलेले सात आरोपींपैकी चार आरोपींना आज न्यायालयात हजर केले. या चार आरोपींची आज पोलीस कोठडी संपत आहे. त्यामुळे त्यांना हजर केले. पण यावेळी NIA चे अधिकारी ही न्यायालयात आहे. आता सगळ्या आरोपींना न्यायालयात आणण्याचे आदेश दिल्याने NIA हे आजच आरोपींचा ताबा घेईल. मुंबईत या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.