नागपूर: काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकारण तापलं आहे. त्यानंतर आता बीडमधील गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणाची चौकशी आणि संपूर्ण तपास सुरू असतानाच फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज नागपुरात बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. बीडमध्ये आम्ही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस?
बीड जिल्ह्याची तुलना ही बिहारसोबत केली जात आहे, तिथे घडत असलेल्या गुन्ह्यांवरून विरोधक मोठ्या टीका करताना दिसत आहेत, याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, घटना जेव्हा घडतात तेव्हा अशा प्रकारच्या चर्चा होतात. याचा अर्थ बीड जिल्ह्याला आपण इतकही बदनाम करू नये. मात्र हे खरं आहे, गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीर स्वरूपाच्या आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेले आहेत, अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी कालही सांगितलं, आजही सांगतो. बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे.
परभणी जिल्ह्यात अनेक नेत्यांनी भेट दिली त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून अजित पवार देखील गेले होते त्यासंबधी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, 'राज्यात घडलेल्या बीडच्या आणि परभणीच्या घटना फार महत्त्वाच्या आहेत. म्हणूनच तिथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली आणि अजित पवार स्वतः त्या ठिकाणी गेले. आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले. घटना महत्त्वाच्या होत्या. म्हणून त्या ठिकाणी ते गेले, मला असं वाटतं की एखाद्या घटनेचे महत्त्व हे कोण गेलं यापेक्षा आपण त्याला काय रिस्पॉन्स करतो, या माध्यमातून होतं. प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतात असं नाही. पण अजित पवारांसारखे सिनियर उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आम्ही पाठवले होते आणि माझं मी मत असतं अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे, विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे. पण त्याचं पर्यटन करू नये हे माझं मत असतं असंही पुढे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.
कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद फडणवीसांना हवं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नागपुरातील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, पालकमंत्र्याच्या संदर्भात आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील. ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल, त्यांनी मला बीडला जायला सांगितलं तर मी बीडला देखील जाईल, किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल. साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात. पण माझी स्वतःची इच्छा आहे, गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो, अर्थात या तीन नेत्यांनी मान्यता दिली तरच मी ते ठेवेन, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
कल्याण अत्याचार घटनेवर फडणवीसांची प्रतिक्रिया
दुर्दैवाने समाजामध्ये या घटना घडताना दिसत आहेत. यावर उपाय म्हणजे न्यायव्यवस्थेने वेगाने न्याय देणे आणि दुसरीकडे समाजात जागृती होणे आवश्यक आहे. 95 टक्के घटना नातेवाईक आणि ओळखीच्या व्यक्तींकडून होतात, हाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच. मात्र, आता हा सामाजिक प्रश्नही झालेला आहे. समाजात महिला आणि मुलींबद्दल संवेदनशीलता येणे आवश्यक आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.