Washim Crime : व्यसनाधीनता आणि मानसिक आजार यांचा किती भीषण परिणाम होऊ शकतो, याचं एक धक्कादायक उदाहरण वाशिम जिल्ह्यातील कोठारी गावात पाहायला मिळालं. पत्नीला दवाखान्यात नेण्याच्या मामुली वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवलं. या दुहेरी घटनेने संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. (Crime news)
पत्नीच्या आग्रहाने संताप, धारदार वीळ्या-कुऱ्हाडीने पत्नीवर वार
मंगरूळपीर पोलिस स्टेशन हद्दीतील कोठारी गावात ही घटना घडली. माहितीप्रमाणे, हिम्मत धोंगडे (वय अंदाजे 40) हा व्यक्ती व्यसनाधीन असून त्याला मानसिक आजाराचा त्रासही होता. त्याच्या पत्नी कल्पना धोंगडे (वय अंदाजे 35) ही पतीला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याचा आग्रह धरत होती. मात्र, या मामुली वादातून संतापलेल्या हिम्मत याने घरातील धारदार वीळ्या-कुऱ्हाडीने पत्नीवर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या कल्पना धोंगडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पत्नीचा खून केल्यानंतर हिम्मत धोंगडे यांनी स्वतः घर बंद करून आतून गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे काही क्षणातच एकाच घरातील दोघांचा दुर्दैवी अंत झाला. या दुहेरी घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये भिती आहे. व्यसनाधीन आणि मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या पतीने पत्नीला दवाखान्यात नेण्याबाबत झालेल्या किरकोळ वादातून संतापून तिच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. इतक्यावरच तो न थांबता त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. एका क्षणात संपूर्ण घर उद्ध्वस्त झाल्याने कोठारी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांचा तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मंगरूळपीर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात हा प्रकार व्यसनाधीनता आणि मानसिक अस्वस्थतेतून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करत आहेत. या घटनेमुळे कोठारी गावात शोककळा पसरली आहे. एकाच वेळी घरातील पती-पत्नी दोघांचा अशा प्रकारे अंत झाल्याने गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत. सामाजिक स्तरावरही व्यसनाधीनतेचे वाढते दुष्परिणाम आणि मानसिक आरोग्याकडे होणारी दुर्लक्ष याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा: