बीड: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा पोलिसांकडून एन्काऊंटर होऊ शकतो, अशी चर्चा सर्वत्र आहे. त्याप्रमाणे वाल्मिक कराड याचा खरोखरच एन्काऊंटर (Walmik Karad Encounter) होऊ शकतो. त्याला अनेक गोष्टी माहिती आहेत. या गोष्टी बाहेर आल्या तर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना त्रास होईल. या गोष्टी बाहेर येऊ नयेत म्हणून वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरचा कट रचला जाऊ शकतो, अशी शंका सगळ्यांच्या मनात आहे, असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले.
बीड पोलीस दलातील निलंबित अधिकारी रणजीत कासले याने काही खळबळजनक दावे केले आहेत. आपल्याला वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी 50 कोटींची ऑफर मिळाली होती, असे कासले याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटले होते. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. याविषयी अंजली दमानिया (Anjali Damania) यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, मला रणजीत कासले हा विकृत आणि विक्षिप्त मनोवृत्तीचा वाटतो. मी त्याचा मद्यधुंद अवस्थेत एक व्हिडीओ पाहिला होता. त्या व्हिडीओ कासले याने वाटेल ते आरोप केले होते. आज त्याने एका व्हिडीओत म्हटले आहे की, मला वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर होती. पण अशा गोष्टींविषयी इतक्या दिवसांनी कोणी बोलत नसते. खरोखरच असे झाले असते तर रणजीत कासले (Ranjit Kasle) पहिल्याच दिवशी बोलला असता. त्यामुळे कासलेच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्याला सस्पेंड केल्यावर ही बुद्धी सुचली का? मला त्याचे आरोप विक्षिप्तपणाचे वाटतात. तो व्हिडीओत खूप कॅज्युअली बोललाय. खरोखरच त्याला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर असती तर त्याने बोलताना त्याचा उल्लेख ठळकपणे केला असता. त्याला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची सुपारी कोणी दिली, तो कोणाला भेटला, तेव्हा काय चर्चा झाली, याबद्दल तो काहीच बोलला नाही. त्यामुळे रणजीत कासले याचा दावा मला तथ्यहीन वाटतो, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
रणजीत कासले नेमकं काय म्हणाला?
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा, एसआयटी बसवा, अशी बातमी मी टीव्हीवर बघितली. ही एसआयटी बसवून काहीही उपयोग होणार नाही. एसआयटीची बसवायची असेल तर केंद्राची एसआयटी बसवा, तरच यामधून सत्य समोर येईल. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती. मी म्हणालो, हे पाप माझ्याकडून होणार नाही. 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, अशी वनटाईन ऑफर दिली जाते. तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या विभागाला बोलावून घेतले जाते. मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होतं, हा माणूस करु शकतो. याच्यामध्ये दम आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील, असे कासले याने म्हटले.
पोलिसांची चार लोकांची टीम आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक होते. बैठकीत विचार केला जातो, काय करायचं. त्यानंतर पाच-सहा जणांची दुसरी विश्वासू लोकांची टीम निवडली जाते, ती घटनास्थळी जाते. जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील. एक अधिकारी, दोन अंमलदार, हवालदार, अशी टीम असते. या सगळ्यांना 5 कोटी, 10 कोटी रुपयांची लम्पसम ऑफर दिली जाते. चौकशी झाली तरी आमचं सरकार आहे, आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करु, असे पोलसांना सांगितले जाते. अशाप्रकारे बोगस एन्काऊंटर होतो, असा दावा रणजीत कासले यांनी केला होता.
आणखी वाचा
मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती, बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा