मुंबई : वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत बांधकामांचे पेव फुटल्याचं समोर आलं आहे. पालिकेच्या दुय्यम अभियंत्याच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर अनधिकृत इमारतींचे बांधकाम झाल्याचं निदर्शनास आलं. यानंतर प्रशासनाने निष्कासन कारवाई न करणाऱ्या दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित केलं आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशांचे अवमान केल्याप्रकरणी अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे. पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांची देखील बदली करण्यात आली आहे. वेसावेतील अनधिकृत बांधकामे निष्कासन कारवाईसाठी नवीन विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.


दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित


कामकाजातील निष्काळजी, बेजबाबदारपणा मुळीच खपवून घेतला जाणार नाही, इशारा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला आहे. 
मुंबईतील के पश्चिम विभाग अंतर्गत वेसावे (Varsova) येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरामध्ये अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करणे, वरिष्ठांनी वारंवार सूचना करूनही त्यांचे निष्कासन न करणे, कामकाजातील इतर नियमित बाबींमध्ये देखील निष्काळजीपणा केल्याप्रकरणी के पश्चिम विभागातील दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर, पदनिर्देशित अधिकारी स्वप्नील कोळेकर यांची देखील बदली करण्यात आली आहे. 


पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव


महानगरपालिका आयुक्तांच्या समक्ष बैठकीस उपस्थित राहण्याची सूचना दिल्यानंतरही गैरहजर राहून निर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल सोमेश शिंदे यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाज आणि जबाबदाऱ्या यामध्ये कोणीही बेजबाबदारपणा, दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा करू नये, अन्यथा त्यांना देखील कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा अप्रत्यक्ष इशाराच महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला आहे. दरम्यान, वेसावेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांच्या मंजुरीने विशेष पथकाची नेमणूक देखील करण्यात आली आहे.


पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकाम


के पश्चिम विभागात 2022 पासून कार्यरत असलेले दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्याकडे प्रभाग क्रमांक 59,60 आणि 63 यांचा कार्यभार सोपवण्यात आला होता. प्रभाग क्रमांक 59 आणि 63 यामध्ये अनधिकृत बांधकामे, मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरफार, मुक्या जमिनीवरील बांधकामे, विशेषतः वेसावे येथे सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन परिसरात आणि दलदलीच्या जमिनीवर अनाधिकृत बांधकामांविषयी प्रशासनाकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सहआयुक्त विश्वास शंकरवार आणि के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी या सर्व तक्रारींची दखल घेऊन त्यावर कारवाई करण्यासाठी सोमेश शिंदे यांना वारंवार सूचना केल्या होत्या. सोमेश यांना प्रत्यक्ष बोलावून संबंधित ठिकाणी पाहणी करून कारवाई करण्याचे देखील निर्देश देण्यात आले होते. 


दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई


वेसावे भागातील अधिकृत बांधकामांविषयी महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांना सविस्तर माहिती देऊन निष्कासनाची कारवाई 3 जून रोजी नियोजित होती. त्याबाबत निर्देश मिळाल्यानंतर देखील सोमेश शिंदे यांनी निष्कासनासाठी कोणतीही तयारी केली नाही. एवढेच नव्हे तर 3 जून आणि 4 जून रोजी प्रत्यक्ष निष्कासन कारवाई सुरू असताना सोमेश शिंदे यांनी निष्क्रियता दाखवली. सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि इतर सहकारी प्रत्यक्ष घटनास्थळी भर उन्हात उभे राहून दिवसभर कारवाई करीत असताना सोमेश शिंदे हे खासगी वाहनात वातानुकुलन यंत्रणा सुरू करून चक्क बसून राहिले. कारवाई पूर्ण होण्याआधीच ते निघून गेले. विशेष म्हणजे, ही निष्कासन कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती आणि तोवर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.


याहून अधिक गंभीर बाब म्हणजे, 5 जून रोजी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी हे पाहणी दौऱ्यावर असताना त्यांनी सोमेश शिंदे आणि स्वप्निल कोळेकर यांना के पूर्व विभाग कार्यालयात बैठकीसाठी बोलावले होते. सोमेश शिंदे या बैठकीस गैरहजर राहिले आणि महानगरपालिका आयुक्तांच्या निर्देशांचे त्यांनी उल्लंघन केले. सोमेश शिंदे यांची अनधिकृत गैरहजेरी, कार्यालयात अनुपस्थिती, इतर कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी नोंदवणे, बाहेर खासगी कार्यालय थाटल्याच्या तक्रारी, महानगरपालिका कार्यालयात नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर कार्यवाही न करणे आणि एकूणच प्रशासकीय कामकाजात हेंडसाळ इत्यादी वेगवेगळ्या कारणांनी सोमेश शिंदे यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. या सर्व प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन सोमेश शिंदे यांना प्रशासकीय कामकाजातील बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा आणि त्यातून महानगरपालिकेची प्रतिमा मलीन करणे या कारणांसाठी खाते अंतर्गत चौकशी पूर्ण होईपर्यंत आजपासून निलंबित करण्यात आलं आहे.


अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक


दरम्यान, वेसावे परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त गगराणी यांची लेखी मंजुरी मिळाली आहे. या पथकामध्ये पथक प्रमुख म्हणून प्रभारी पदनिर्देशित अधिकारी तथा सहायक अभियंता अशोक अदाते, सहाय्यक अभियंताची पंकज बनसोड, दुय्यम अभियंता जयेश राऊत, दुय्यम अभियंता परेश शहा, दुय्यम अभियंता सिद्धार्थ अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.