Vasai Virar Jat Panchayat : विरारच्या चिखल डोंगरी गावातील मांगेला समाजातील जात पंचायतीची अनिष्ट प्रथा बंद झाली असली तरी जात पंचायतीची दहशत आणि गुंडगिरी सुरूच आहे. जात पंचायतीने आकारलेल्या दंडाची रक्कम काही ग्रामस्थांना अद्याप परत करण्यात आलेली नाही. दंडाची रक्कम परत करण्याऐवजी या पीडितांनाच त्रास देण्याचा प्रकार सुरू झाला आहे. याबाबत पीडित ग्रामस्थांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. माञ पोलीस योग्य भूमिका घेत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. 


विरारमधील चिखलडोंगरी गावात जात पंचायत प्रकरण नोव्हेंबर 2023 मध्ये उघडकीस आले होते. या गावात हिंदू मांगेला समाज राहतो. त्यांच्यात हे जात पंचायत प्रकरण सुरू होते. विविध कारणांमुळे ग्रामस्थांवर बहिष्कृत करून दंड आकारला जात होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी सामाजिक बहिष्कार कायद्याअंतर्गत १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. वसईच्या तहसीलदार, पोलिसांनी देखील गावात सभा घेऊन जनजागृती केली होती.  आणि अशा प्रकारे जात पंचायत बेकायदेशीर असल्याचे पटवून दिले होते. त्यानंतर जाहीर माफी मागून जात पंचायत बरखास्त करण्यात आली होती. ज्यांच्याकडून दंड आकारला होता त्यांना परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गावातील उमेश वैती यांच्याकडून 70 हजार रुपये आणि दर्शन मेहेर यांच्याकडून घेण्यात आलेला 40 हजार रुपयांचा दंड अद्याप परत करण्यात आलेला नाही.


दंडाची रक्कम मागितल्याने उलट या पीडितांनाच शिविगाळ करणे, त्यांच्या रिक्षा आणि साहित्याची नासधूस करण्याचे प्रकार करण्यात आले आहे. यामुळे वैती आणि मेहेर यांनी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी लेखी तक्रार दिली आहे. गावातील जात पंचायत बरखास्त करताना आम्हाला आमच्या दंडाची रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु ३ महिने उलटूनही ते अद्याप पूर्ण झालेले नाही, असे तक्रारदार उमेश वैती यांनी सांगितले. याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर गावातील जात पंचायतीच्या लोकांनी उमेश वैती यांच्या रिक्षाची तोडफोड केली आहे. शनिवारी मी पोलिसांत तक्रार दिली परंतु पोलिसांनी गांभीर्याने कारवाई केली नसल्याचे वैती यांनी सांगितले. या प्रकरणी आमच्याकडे तक्रार आली असून, आम्ही कारवाई करत आहोत, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले आहे.


आणखी वाचा :


शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, राज्यसभेसाठी छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही!