मुंबई: नालासोपारात (Nalasopara) एका वकिलाने वाहतूक महिला पोलिसाच्या अंगावर गाडी घालून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली असून जखमी महिला पोलिस विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार घेत आहे. तर आरोपी वकील आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. 


व्यवसायाने वकील असणाऱ्या ब्रजेश भेलोरिया यांची मोटार सायकल नो पार्किंगमध्ये उभी होती. त्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांची मोटारसायकल नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क येथील वाहतूक शाखेच्या गोडावून येथे आणून ठेवली होती.  सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास आरोपी ब्रजेश कुमार भेलोरिया आणि त्यांची पत्नी यांनी त्यांची मोटारसायकल घेण्यासाठी त्या ठिकाणी आले. गोडावूनमध्ये असलेली मोटार सायकल त्यांनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे ड्युटीवर तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचारी प्रज्ञा दळवी यांनी गोडावून मधून गाडी घेवून जाताना त्यांना अडवलं. ही गाडी न्यायची असेल तर दंड भरावा लागेल असं ते म्हणाले.


आरोपींनी त्या ठिकाणच्या महिला पोलिसांशी हुज्जत घालून, आरोपी ब्रजेश याने महिला पोलिसाच्या अंगावरच गाडी चढवली. यात महिला पोलिस खाली पडून तिच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला दुखापत झाली आहे. सदर महिला पोलिसाला विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. तर आरोपी ब्रजेश कुमारला आणि त्यांच्या पत्नीवर नालासोपारा पोलिसांनी कलम 307, 353, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. वसई न्यायालयानं दोन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  


आरोपीच्या वकिलांनी पोलिसांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. आपल्या क्लायंटला खोट्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप त्यांनी पोलिसांवर केला आहे.  महिला पोलिस कर्मचारी आणि तो वकील यांच्यामध्ये एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. यावर पोलिसांनी काही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :