Vasai Crime : वसईच्या (Vasai) वालीव परिसरात भर रस्त्यावर हवेत गोळीबार (Firing) आणि तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. या प्रकरणाचा तपास वालीव पोलिसांना लागला आहे. डुक्कर (Pig) पकडण्याच्या वादातून एका व्यक्तीने मावस भावावारच तलवारीने (Sword) वार केल्याचं उघड झालं आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार केल्याची माहिती वालीव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश बर्वे यांनी दिली. 


डुक्कर पकडण्याच्या वादातून मावस भावांमध्ये वाद 


हरिजत सिंह उर्फ दादू असं तलावरीच्या प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सुनील सिंह, राहुल सिंह, सुरज सिंह, रवी सिंह अशी हल्ला करणाऱ्या आरोपींची नावं असून सर्वजण वसई पूर्व सातीवली परिसरात राहतात. जखमी आणि आरोपी हे सख्खे मावस भाऊ असून त्यांचा डुक्कर पाळणे आणि पकडण्याचा व्यवसाय आहे. डुक्कर पकडण्याच्या वादातून या मावस भावांमध्ये वाद निर्माण झाला होता. मंगळवारी (20 डिसेंबर) संध्याकाळी सहाच्या सुमारास वसई पूर्वमधल्या वालीव परिसरातील नाईकपाडा इथे बोलेरो पिकअप गाड्यांची एकमेकांना धडक झाली. त्यानंतर भर रस्त्यात हवेत गोळीबार करुन चार जणांनी एकाला पकडून तलवारीने पायावर, हातावर जोरदार वार केले होते. वार करुन त्या आरोपींनी जखमीला त्याच बोलेरो पिकअप गाडीत टाकलं आणि त्याला घेऊन फरार झाले होते. 


अंगावर काटा आणणारी दृश्ये


या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. कोणत्याही व्यक्तीच्या अंगावर काटा आणतील अशी सीसीटीव्ही फुटेजमधील दृश्य आहेत. घटना घडताच पोलीस उपायुक्त सुहास बावचे, वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश बर्वे, क्राईम ब्रान्चच्या दोन टीम घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील थरार पाहाता आरोपींनी जखमीला गाडीत घालून कुठल्यातरी अज्ञात स्थळी नेऊन त्याची हत्या करुन मृतदेह फेकला असावा, असा अंदाज रचून सर्व पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. 


पुन्हा डुक्कर पकडू नये या उद्देशाने प्राणघातक हल्ला


आरोपी आणि जखमी हे नात्यातीलच आहेत. परंतु जखमी व्यक्ती पुन्हा डुक्कर पकडू शकणार नाही या उद्देशाने आरोपींनी भर रस्त्यात त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पोलिसांचा घटनास्थळावर पंचनामा सुरु असतानाच प्लॅटिनम हॉस्पिटलमधून पोलिसांना फोन आला की, एका जखमी इसमाला हॉस्पिटलमध्ये सोडून साथीदार फरार झाले आहेत. ही बातमी कळताच पोलिसांनी प्लॅटिनम रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली असता आरोपींनी प्राणघातक वार करुन, हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आणि त्यानंतर ते तिथून पसार झाल्याचं समोर आले आहे. या प्रकरणीवालीव पोलीस ठाण्यात  तात्काळ फरार आरोपींवर प्राणघातक हल्ला आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्या शोधासाठी पथकं तयार करुन रवाना केली आहेत. 


VIDEO : Vasai Attack : वसईच्या नाईकपाड्यात अपहरणाचा थरार, तलवारीने हल्ला करत अपहरण