Vanraj Andekar Pune Crime News: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्या हत्येने पुण्यात खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळी पुण्यातील नाना पेठे येथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार (Pune Crime News) आणि कोयत्याने वार करण्यात आला. जवळपास 14-15 जणांची वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. सदर प्रकरणी पुणे पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.
वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांच्यावर कौटुंबिक वादातून हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. मात्र यादरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. गुन्हे शाखेने दोन वर्षांपूर्वी एका गुन्हेगाराला हैदराबाद येथून अटक केली होती. आंदेकर टोळीतील काही गुंडांनी हैदराबाद वरून अटक केलेल्या गुन्हेगाराच्या साथीदाराचा हात तोडला होता. तेव्हापासून आंदेकर आणि त्या टोळीतील संघर्षाला सुरुवात झाली होती. सध्या हा गुन्हेगार तुरुंगात असला तरी त्यावेळी त्याने तपासादरम्यान आंदेकर याचा खून करणार असल्याचा दावा केला होता. त्यातच वनराज आंदेकर याचा झालेला खून हा चर्चेचा विषय ठरला आहे. हा खून होण्यापूर्वी काही तास एक या घटनेच्या अनुषंगाने एक मेसेज व्हायरल झाला होता. त्यामुळे ही घटना केवळ कौटुंबिक वाद आहे की कट, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
नाना पेठेत 14 ते 15 हल्लेखोर दुचाकी घेऊन आले. यावेळी एका मित्रासोबत उभे असलेले वनराज आंदोरकर यांच्या अंगावर धावून जात गोळीबार करण्यास सुरुवात केली. काहीजण कोयता घेऊन त्यांच्या अंगावर गेले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वनराज आंदेकर यांना पाच राऊंडपैकी एक देखील गोळी लागली नाही. मात्र गोळीबारानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सदर घटनेनंतर वनराज आंदेकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा-
नाना पेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे. आंदेकर टोळी गेली पंचवीस वर्ष पुण्यात गुन्हेगारी कारवाया करत असून प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खुनाच्या प्रकरणी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याला जन्मठेपेची शिक्षा ही झालेली आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत आंदेकरविरुद्ध 1985 पासून खून, खुनाचे प्रयत्न, धमक्या देणे, शस्त्रे बाळगणे, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुण्यातील फरासखाना, खडक व समर्थ या पोलीस ठाण्यात, तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.