Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. राजबपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्कपूर गावात भावाने रागाच्या भरात आपल्या बहिणीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील गहू विकण्यासाठी 24 वर्षीय पुष्पेंद्र गुप्तपणे निघाला होता. त्याच्या या कृतीत अडथळा आणल्यामुळेच त्याने 22 वर्षीय बहिणी रेखाचा जीव घेतला.
नेमकं घडलं काय?
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घरातील गहू विकण्यासाठी 24 वर्षीय पुष्पेंद्र गुप्तपणे निघाला होता. त्याच्या या कृतीत अडथळा आणल्यामुळेच त्याने 22 वर्षीय बहिणी रेखाचा जीव घेतला. रेखाने भावाला रोखण्याचा प्रयत्न करताच तो संतापला आणि जवळ असलेली कुऱ्हाड उचलून तिला लक्ष्य केले. काही क्षणांतच रक्ताच्या थारोळ्यात रेखा कोसळली. फक्त बहिणीवरच नव्हे तर आरोपीने स्वतःच्या आईवरही हल्ल्याचा प्रयत्न केला होता. सुदैवाने आई वेळेत पळून गेल्याने तिचा जीव वाचला. शेजाऱ्यांच्या आरडाओरडीनंतर गावभर भीतीचं वातावरण पसरलं. घटनेनंतर त्वरित पोलिसांना कळवण्यात आलं.
गावाजवळील शेतातून आरोपी जेरबंद
दरम्यान, सहाय्यक पोलिस अधीक्षक अखिलेश भदौरिया यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक पथक आणि पंचनामा अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. ठिकाणाहून शस्त्रासह अनेक पुरावे जप्त करण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कुटुंबीयांचा आक्रोश पाहून अनेक ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू दाटले. हत्येनंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी तातडीची मोहीम हाती घेतली. काही तासांच्या शोधानंतर तो गावाजवळील शेतातून जेरबंद करण्यात आला. बहिणीची हत्या केल्यानंतर, आरोपी भाऊ पुष्पेंद्र घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
अर्कपूर गावात दहशत पसरली
या घटनेनंतर संपूर्ण गावात दहशतीचे आणि शोकाचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेने अर्कपूर गावात दहशत पसरली आहे. भावाने स्वतःच्या बहिणीवर कुर्हाडीने वार केला, ही कल्पनाही ग्रामस्थांना अंगावर काटा आणणारी ठरत आहे. स्थानिक लोकांच्या मते, गहू विकण्याच्या किरकोळ वादातून एवढं मोठं पाऊल उचललं जाईल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. गावात या घटनेनंतर चर्चेला उधाण आलं असून अशा रागाच्या भरात घेतलेल्या निर्णयामुळे एका तरुणीचा बळी गेला आणि एक कुटुंब उद्ध्वस्त झालं, याबद्दल संताप व्यक्त होत आहे. पोलिस मात्र आरोपीची चौकशी करून नेमक्या कारणांचा तपास करत आहेत.