Pimpri Chinchwad Murder : एकतर्फी प्रेमातून हाणामारी आणि हत्येच्या घटना आधीही आपल्या कानावर आल्या आहेत. आता पिंपरी चिंचवडमधून अशीच एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीच्या सात वर्षीय भावाचं अपहरण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे. संशयित मुख्य आरोपी हा इंजिनियरिंगचं शिक्षण घेत आहे. संशयित आरोपीनं चिमुकल्याचं अपहरण करुन हत्या केली. संशयित आरोपी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्याच्या बहिणीच्या प्रेमात पडला होता. 


अपहरण करुन आदित्यची हत्या


चिमुकल्याचं कुटुंबीय आणि संशयित आरोपीचं कुटुंब एकाच इमारतीत वास्तव्यास आहेत. एकतर्फी प्रेमप्रकरणातून त्यांचे अनेकदा खटके उडत होते. यातून बदला घेण्याचं आरोपीनं ठरवलं. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी संशयित आरोपीनं तरुणीचा सात वर्षांचा लहान भावाचं अपहरण केलं. यासाठी त्यानं एका मित्राची मदत घेतली. चिमुकल्याला एका गाडीत घातलं अन तिथंच गळा घोटून चिमुकल्याचा जीव घेतला. पुढे या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी आरोपींनी चिमुकल्याच्या कुटुंबियांकडे 20 कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणीचा मेसेज येताच चिमुकल्याच्या कुटुंबियांनी पोलिसांची मदत घेतली. प्रकरण पिंपरी पोलिसांपर्यंत पोहचलं. पोलिसांकडून तपासाची चक्र हलविण्यात आली. प्रकारणाचं गांभीर्य पाहता पोलिसांनी शिताफीने तपास सुरू केला. 


तपास भरकटवण्यासाठी खंडणीचा मेसेज


तपास सुरू असताना आरोपीची पोलिसांवर नजर होती. संशयित आरोपीकडून पोलिसांच्या तपासात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न सुरुच होता. त्यासाठी त्याने खंडणीचा मेसेच केला. तितक्यात ज्या व्हाट्सअ‍ॅप नंबरवरून खंडणीसाठी मेसेज आला, त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र तो एक मजूर निघाला. त्या मजुराचा या सर्व प्रकरणात सहभाग नसल्याचं समोर आलं. त्या मजूराचा नंबर व्हाट्सअ‍ॅपसाठी कोणीतरी स्वतःच्या मोबाईलमध्ये अ‍ॅक्टिव्ह केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता, यामध्ये आरोपीचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं. आरोपीला पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्यानं सर्व सत्य सांगून टाकलं. चिमुकल्याचा मृतदेह भोसरी एमआयडीसीतील बंद पडलेल्या कंपनीच्या टेरेसवर ठेवल्याचंही आरोपीनं सांगितलं. 


पुढील चौकशीत समोर आलं की, या प्रकरणात मदत घेतलेल्या मित्राला सुद्धा आपण काय करतोय याची पुसटशी कल्पना येऊ दिली नाही. जेव्हा आरोपीनं आदित्यची हत्या केली तेव्हा मित्राला ही धक्का बसला. पण त्याला हे कळेपर्यंत उशीर झाला होता अन तो या हत्येचा भाग बनला होता. या दोघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर ही हत्या खंडणीसाठी नव्हे तर प्रेमप्रकरणातून झाल्याचं निष्पन्न झालं आहे.