सांगली : सांगलीतील कृषी विभागाच्या भरारी पथकाने सांगलीतील ग्लोबल इम्पोर्टसमधील 21 लाखांचे विनापरवाना खत जप्त केलं आहे. शेतकऱ्यांना आणि किरकोळ उत्पादकांना तसेच काही कृषी सेवा केंद्राना या ठिकाणी अनधिकृतपणे खते विकली जातात. याची गोपनीय माहिती भरारी पथकाला मिळाली होती. त्यानंतर जिल्ह्यास्तरीय भरारी पथकाने ग्लोबल इम्पोर्टसच्या कार्यालयात छापा टाकून ही कारवाई केली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बनावट खताचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात 11 भरारी पथके नियुक्त केली आहेत. या पथकाला सांगलीतील ग्लोबल इम्पोर्टसमध्ये विनापरवाना खताची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील, मोहीम अधिकारी धनाजी पाटील यांच्यासह पथकाने छापा टाकला.
ग्लोबल इम्पोर्टस्मध्ये मॅग्नेशियम सल्फेट, फेरस सल्फेट, सल्फर, बोरॉन, झिंक सल्फेट, कॅल्शियम नायट्रेट अशी खते आढळून आली. पथकाने तोसिफ मार्फानी यांच्याकडे खतांच्या पावत्यांची मागणी केली. परंतु त्यांच्याकडे पावत्या आढळून आल्या नाहीत. तसेच ते कृषी विभागाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता खतांची विक्री करीत असल्याचे आढळून आले.
त्यामुळे भरारी पथकाने कॅल्शियम नायट्रेट 2 टन, सल्फर 2 टन, सल्फर 900 किलो, झिंक सल्फेट 400 किलो, फेरस सल्फेट 2 टन, मॅग्नेशियम सल्फेट 50 किलो, बोरॉन 2 टन, सिलिकॉन गोळी 5 टन, सिलिकॉन पावडर 10 टन,।हुमिक फ्लेक्स 30 टन, बेन्टोनेट गोळी 30 टन अशी 4।लाख 10 हजार 600 रुपये किंमीतीची 84 टन 350 किलो खते जप्त केली. तसेच 16 लाख 50 हजार रुपये किंमतीचे अन्य साहित्य जप्त केले. या खतांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत, असे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक पाटील यांनी सांगितले.या प्रकरणी आता संबंधितावर संजय नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :