Mumbai Crime News : गेल्या शुक्रवारी संध्याकाळी सीएसएमटी (CSMT) जंक्शन येथे आराम फूड जॉइंटजवळील आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या दोन ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणं, कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून मारहाण केल्याप्रकरणी मलबार हिल पोलीस (Malabar Hill) ठाण्याच्या 5 पोलीस हवालदारांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच, शिक्षा म्हणून पाचपैकी दोन जणांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, "हवालदारांनी ज्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली, त्यांच्यापैकी एकानं त्यांच्या सहकाऱ्यांना पोलीस ठाण्यात पाठवून बॅक-अप पोलीस दलाला पाचारण करण्यास सांगितलं. पोलीस पथक आल्यानंतर पाच संतप्त हवालदारांना थांबवता आलं." एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यानं या घटनेची पुष्टी केली आणि सांगितलं की, गोंधळ घालण्यात गुंतलेल्या पाचपैकी दोन कॉन्स्टेबलची शिक्षा म्हणून दक्षिण विभागीय कार्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, "सहाय्यक उपनिरीक्षक धनंजय भोसले आणि हवालदार महेश पाटील अशी या दोघांची नावं असून ते आझाद मैदान पोलीस ठाण्यात तैनात आहेत. काही कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी ते सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात गेले होते. परत येताना त्यांनी पाहिलं की, पाच पोलीस हवालदार एका कारमध्ये बसून गोंधळ घालत आहेत. ते खिडक्या उघड्या ठेवून बसले होते आणि आजूबाजूनं येणाऱ्या लोकांकडे बोट दाखवत आतून आरडा-ओरड करत होते."
आधिकाऱ्यानं पुढे बोलताना सांगितलं की, "या पाच जणांनी भोसले आणि पाटील दुचाकीवरून जात असताना त्यांच्याकडे बोट दाखवलं. त्यानंतर ड्युटीवर असलेले दोन पोलीस या माणसांची तपासणी करण्यासाठी थांबले. भोसले आणि पाटील त्यांच्या गणवेशात नव्हते, त्यांनी स्वतःची ओळख पटवली तेव्हा त्या पाच जणांपैकी तीन जण गाडीतून उतरले. इतर दोघे सामील होण्यापूर्वी त्यांनी दोघांना शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी, भोसले तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यातील त्यांच्या एका सहकाऱ्याला फोन केला. त्यांनी गस्त घालणारी मोबाईल व्हॅन घटनास्थळी पाठवली. प्रत्येकाला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि प्राथमिक चौकशीदरम्यान आम्हाला कळलं की, पोलीस कर्मचार्यांना मारहाण करणारे पाच लोक मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले पोलीस हवालदार आहेत.", असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.
निवृत्ती गायकवाड (29), गुरु सावंत (32), नीलेश फडतरे (27), संजय पवार (32), राकेश खोत (34) अशीस गोंधळा घालणाऱ्या पाच हवालदारांची नावं आहेत. यांच्यापैकी गायकवाड आणि सावंत यांना शिक्षा झाली असून त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. या घटनेची माहिती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांना संशय आहे की, हे पाच कॉन्स्टेबल मद्यधुंद होते. परंतु याची पुष्टी करण्याचा कोणताही मार्ग नाही कारण एफआयआर नोंदवला गेला नाही. म्हणून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं गेलं नाही. आझाद मैदान पोलिसांनी या घटनेचा सविस्तर अहवाल त्यांच्या वरिष्ठांना पाठवला आहे. पुढील तपास सुरू आहे.