बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनाजी जाचक यांच्या मुलाचे अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या दोघा आरोपींना बारामती शहर पोलिसांनी अटक केलीय. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी येथे सिनेमा स्टाईलने दोघा आरोपींना अटक करण्यात आली. अवघ्या बारा तासात अपहृत युवकाचा शोध घेत पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवलंय.
बारामती शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (शुक्रवारी) सायंकाळी सव्वा सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास कृष्णराज जाचक आणि पृथ्वीराज नामदेव चव्हाण हे दोघेजण घरी जात होते. त्यावेळी जळोचीतील पानसरे ड्रीम सिटीच्या बाजूला त्यांची गाडी अडवून टोयाटा कंपनीच्या इटीयॉस कारमधून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर कृष्णराज जाचकला जबरदस्तीने गाडीत घालून नेत कृष्णराजच्या गाडीची चावी हिसकावून घेत आमच्या फोनची वाट बघा असं सांगून पोबारा केला.
काल शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कृष्णराजच्या मोबाईल वरून या चार अरोपीपैकी एकाने धनाजी जाचक यांना फोन केला. "आपण एका तासाच्या आत पाच कोटीची खंडणी द्या." नाहीतर आपल्या मुलाला मुकाल." अशी धमकी दिली. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी लागलीच संबंधित मोबाईलचं लोकेशन घेवून वेगवेगळ्या ठिकाणी कृष्णराजचा शोध घेण्यासाठी पथकं रवाना केली. या दरम्यान, संबंधित आरोपी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी येथे असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ व युवकांच्या मदतीनं दोघा आरोपींना अटक करत वाहनचालकाला ताब्यात घेतलंय.
सुनिल लक्ष्मण दडस (वय 26, रा. दुधेबावी, ता. फलटण, जि. सातारा), गौरव साहेबराव शेटे (वय 20, रा. वायसेवाडी खेड, ता. कर्जत, जि. अहमदनगर) या दोघांना या अपहरणप्रकरणी अटक करण्यात आलीय. तर वाहनचालक संतोष शरणप्पा कुडवे (रा. चंदननगर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणातील आरोपी हे डाळींबाचे व्यापारी आहेत. त्यांना या व्यवसायात मोठं नुकसान झालेलं होतं. त्यातूनच झटपट श्रीमंत होण्याच्या दृष्टीने त्यांनी हा अपहरणाचा कट रचल्याचं अप्पर पोलिस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी सांगितलं. धनाजी जाचक हे व्यासायिक आहेत आणि प्रगतशील बागायतदार देखील आहेत.