मुंबई : कफ परेडच्या आंबेडकरनगर झोपडपट्टीत बक्षीस दिलं नाही म्हणून एका तृतीयपंथीयाने तीन महिन्याच्या जिवंत बाळाला खाडीत पुरून त्याची  हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी कफ परेड पोलिसांनी आरोपी तृतीयपंथी कन्नया उर्फ कन्नू चौघुले आणि साथीदार सोनू काळे या दोघांना अटक केली आहे. मात्र या हत्येमागील कारण जेव्हा कळलं तेव्हा एकच खळबळ उडाली.


कफ परेडच्या आंबेडकरनगर झोपडपट्टीत सचिन चितकोटे हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. आई, वडिल, पत्नी, भाऊ आणि मुलं असा त्यांचा परिवार आहे. सचिन यांना तीन महिन्यापुर्वी आर्या झाली. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. घरात मुलं झाल्याचं कळाल्यानंतर परिसरात राहणारा तृतीयपंथी कन्हैया उर्फ कन्नू चौघुले हा सचिन यांच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी आला. त्यावेळी त्याने कुटुंबियांकडे एक साडी, नारळ आणि 1100 रुपयांची मागणी केली. माञ लॉकडाऊन असल्यामुळे सध्या घरात पैशांची चणचण असल्याचे सांगत दिवाळीत देऊ असे सांगितले. याच गोष्टीचा राग अनावर झाल्याने तणतण करत कन्नू हा घराबाहेर पडला. 


सध्या पाऊस पडत नसल्यामुळे उकाडा वाढलेला आहे. मुलीला गरम होऊ नये म्हणून कुटुंब घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपत होते याची माहिती कन्नूला होती. याच संधीचा फायदा घेऊन मध्यराञी  कन्नूने घरात घुसून आर्यांचं अपरहण केले. यात सोनूने त्याला मदत केली. त्यानंतर दोघांनी आर्याला कफपर्डच्या खाडीत जिवंत पुरून पळ काढला. राञी घरात एक मांजर शिरली तिने घरातील एक प्लेट पाडल्यानंतर आल्याची आई ज्योत्स्ना यांना जाग आली. त्यावेळी आर्या शेजारी नव्हती. त्यानंतर कुटुंबियांनी आर्याची शोधा शोध सुरू केली. संशय कन्नूवर असल्याने त्याचाही शोध सुरू केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
 
पोलिस आणि मुलीचे कुटुंबिय मागावर असल्याचे कळाल्यानंतर कन्नू स्वत:हून कफपरेड पोलिस ठाण्यात हजर राहिली. पोलिस तपासात गुन्ह्यांचा कबूली दिल्यानंतर आरोपींनी सोनूला ही शोधून काढले. पैसे न दिल्याच्या रागातूनच हे कृत्य केल्याची कबूली कन्नूने पोलिसांना दिली. या दोघांना कफपरेड पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे.