मुंबई : 28 मार्च रोजी दुपारच्या सुमारास सचिन वाझेला मुंबईतील मिठी नदी या ठिकाणी नेण्यात आलं होतं. साडे तीन तासाच्या सर्च ऑपरेशननंतर मिठी नदीमधून ते सर्व पुरावे काढले जे सचिन वाझे यांनी नष्ट करण्याच्या उद्देशाने मिठी नदीमध्ये फेकून दिले होते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे विनायक शिंदेच्या घरात जो प्रिंटर होता त्यामधून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणारं पत्र प्रिंट करण्यात आलं होतं. तर सचिन वाझेच्या सोसायटीमधील डीवीआरसुद्धा एनआएच्या हाती लागला आहे. 


सर्च ऑपरेशन करत असताना एनआयने (NIA) सचिन वाझेंना (Sachin Vaze) सुद्धा घटनास्थळी सोबत नेलं होतं. वाझेंनी हे पुरावे स्वत: बिकेसी येथील मिठी नदीमध्ये टाकले असावेत म्हणून एनआयएने वाझेंना सोबत घेऊन त्या सर्व ठिकाणांची पाहणी केली. 


मिठी नदीमधून एनआयएच्या हाती नेमकं काय-काय लागलं?



  • 2 नंबर प्लेट

  • 1 प्रिंटर 

  • 1 लॅपटॉप

  • 1 USB वायर

  • 2 हार्ड डिस्क

  • मोबाईल कव्हर

  • कार्ट्रेज


या वस्तूंमधील सापडलेले डीव्हीआर सचिन वाझेंच्या सोसायटीतील असण्याची शक्यता आहे.  क्राईम इंटेलिजन्स युनिटकडे जेव्हा या प्रकरणाचा तपास होता. त्यावेळेस सचिन वाझेचा सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाज काझींनी सचिन वाझेंच्या सोसायटी मधील डीव्हीआर आणि सीसीटीव्ही आपल्या ताब्यात घेतले होते.


क्राईम इंटेलिजिन्स युनिटकडे जेव्हा याचा तपास होता तेव्हा जे पुरावे क्राईम इंटेलिजन्स युनिटला सापडले होते. ते त्याने रेकॉर्डवर घेतले नव्हते. पोलिसांच्या एसओपीप्रमाणे एखाद्या केसचा तपास करत असताना एखाद्या व्यक्तीचा जबाब किंवा त्यासंदर्भात हाती लागलेले काही पुरावे असतील त्यांची नोंद करणे गरजेचे आहे. मात्र या प्रकरणामध्ये सचिन वाझेने या पुराव्यांची नोंद केली नव्हती. त्यामुळे वाझे संशयाच्या भोवऱ्यात आले.


मुकेश अंबानी यांच्या निवासस्थाना बाहेर स्कॉर्पिओ गाडीमध्ये एक धमकीचे पत्र सापडलं होतं. ज्यामध्ये अंबानी कुटुंबीयांना धमकी देण्यात आली होती. ते पत्र मिठी नदीतून सापडलेल्या प्रिंटरमधून टाईप केलं गेलं होत आणि तो प्रिंटर विनायक शिंदेचा असावा असा संशय एनआयएला आहे. पत्र टाईप करून झाल्यानंतर तो प्रिंटर आणि त्यासोबत इतर पुरावे मिठी नदीत फेकून देण्यातअसल्याचा एनआयएचा निष्कर्ष आहे.  तर जे नंबर प्लेट मिठी नदीतून सापडले ते वॉल्वो गाडीचे असण्याची शक्यता आहे. ही  वॉल्वो गाडी दहशतवादविरोधी पथकाने वापीमधून जप्त केली होती. या वॉल्वो गाडीचा या गुन्ह्यात कसा वापर झाला हे अजून स्पष्ट होऊ शकले नाही आहे.


मिठी नदीतून ज्या वस्तू सापडल्या आहेत त्या सर्वांची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येणार असून त्याच्या मधील डेटा मिळवण्याचं काम एनआयए करणार आहे. फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर हे स्पष्ट होईल की या सर्व गोष्टींचा वापर कसा केला गेला.