मुंबई : एफआयए रद्द करण्यासाठी पोलीस निरीक्षकाने दोन लाख रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या आंबोली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक राधेश्याम शर्मा यांनी गुन्हा रद्द करण्यासाठी दोन लाख रुपये घेतल्याची तक्रार व्यावसायिक राकेश शाह यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली आहे. राकेश शाह यांनी पोलीस आयुक्तांना याबाबत पत्र लिहिलं आहे.


तक्रारदार व्यावसायिक राकेश शाह हे इन्शुरन्स कन्सल्टंट म्हणून काम करतात. त्यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, "कोरोना काळात जेव्हा लॉकडाऊन करण्यात आला होता, त्यावेळी काम बंद असल्याने 2 जून 2020 रोजी माझ्या काही मित्रांना जेवणासाठी दुपारी ऑफिसमध्ये बोलावलं. जेवण झाल्यानंतर टाईमपास करण्यासाठी रमी खेळत होते. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आंबोली पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक राधेश्याम शर्मा अचानक ऑफिसमध्ये आले. लॉकडाऊन असताना इथे काय करत आहात अशी विचारणा त्यांनी केली. मित्र आणि आपण जेवणासाठी भेटलो आणि टाईमपास करण्यासाठी रमी खेळत होतो, असं त्यांना सांगितलं. मात्र आपल्याला कंट्रोल रुममधून कॉल आला आणि तुम्ही जुगाराचं रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तुमच्यावर गुन्हा नोंद केला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. 




तुम्हाला चुकीची माहिती मिळाली असल्याचं मी सांगितलं परंतु पोलीस निरीक्षक काहीही ऐकण्यास तयार नव्हेत. जुगार रॅकेट चालवण्याच्या आरोप तुम्हाला अटक करण्याचे निर्देश डीसीपींनी दिले आहेत. आम्हाला जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये नेलं. आम्हाला एक तास तिथेच ठेवलं. त्यानंतर राधेश्याम शर्मा आले आणि डीसीपींनी तुमच्यासह चार जणांवर लॉकडाऊनचे नियम आणि जुगाराचं रॅकेटप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सांगितलं. आम्हाला कुटुंब आहे शिवाय लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असल्याचं आम्ही राधेश्याम यांना सांगितलं. यानंतर मला दहा मिनिटं द्या मी डीसीपींसोबत बोलून येतो असं सांगितलं. परत आल्यावर गुन्हा रद्द करायचा असेल तर आमचे डीसीपी चांगल्या मूडमध्ये आहेत. डीसीपी साहेबांना एक लाख रुपये द्यायचे आहेत तसंच एक लाख मला आणि माझ्या स्टाफसाठी असे दोन लाख रुपये जर तुम्ही दिले तर गुन्हा रद्द करण्यात येईल, असं राधेश्यम शर्मा यांनी म्हटलं. कोणताही पर्याय नसल्याने मी राधेश्याम शर्मा यांना दोन लाख रुपये दिले आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला सोडलं.




2020 मधील या प्रकाराची तक्रार दोन वर्षांनी केल्याकरत ली असं विचारलं असता व्यावसायिक राकेश शाह म्हणाले की, "सर्वसामान्य माणूस असल्याने पोलिसांविरोधात तक्रार करण्याची हिंमत त्यावेळी नव्हती. तो माझ्या कष्टाचा पैसा होता. शर्मासारखे पोलीस अधिकारी कशाप्रकारे आम्हाला गृहित धरुन पैसा लुटतात यामुळे दोन वर्षांपासून मी नाराज होतो. पोलिसांनी टाकलेला हा दरोडा आहे. आता संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे."


राधेश्याम शर्मविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी विनंती राकेश शाह यांनी संजय पांडे यांच्याकडे केली आहे. आता पोलीस आयुक्त संजय पांडे यामध्ये काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.