ठाणे : माहिती अधिकार (RTI) कायद्यान्वये मिळवलेल्या माहितीचा गैरवापर करून तसेच उपोषणास बसून शासकीय अधिकाऱ्यांकडून दोन लाख रूपये मागणाऱ्या तिघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने (Thane police) अटक केली आहे. नाशिक मधील माहिती अधिकार कार्यकर्ता सुभाष पाटील,साप्ताहिक 'लोक राजकारण'चा संपादक पत्रकार समशाद पठाण, अंबरनाथ मधील पत्रकार संतोष हिरे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
ही खंडणीखोर टोळी माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती प्राप्त करून पैसे कमविण्यासाठी त्याचा दुरूपयोग करत होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक या परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वरिष्ठांकरवी कारवाई करण्याची भीती घालून तसेच वर्तमानपत्रात बातमी छापून कारवाईच्या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसून ही टोळी अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करायची. त्यानंतर त्या अधिकाऱ्यांकडून खंडणीची मागणी करत होती अशी माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
या प्रकरणी कळवा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक जयंत दामोदर जोपळे यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, सदर आरोपी यांनी मिळून कळवा दुय्यम निबंधक कार्यालयात भ्रष्टाचार सुरू असल्याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रात छापून बदनामी करण्याची धमकी दिली होती. तसेच जोपळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी याकरीता संबधीत वरिष्ठ कार्यालयात तक्रार अर्ज करू अशी धमकी दिली होती.
तक्रार न करण्यासाठी या टोळीने जोपळे यांच्याकडे दोन लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. परंतु जोपळे यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने या टोळीने त्यांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्या. तर आझाद मैदान, मुंबई येथे वेळोवेळी उपोषणास बसून दोन लाख रूपये खंडणी मागितली. अखेर जयंत जोपळे यांनी पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने संतोष हिरे यास 50 तर समशाद पठाण यास एक लाख रुपयांची रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. या दोघांचा तिसरा साथीदार आर टी आय कार्यकर्ता सुभाष नबू पाटील यास देखील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
ही बातमी वाचा: