ठाणे : ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांनी नशेच्या धुंदीत तब्बल पाच जणांना जखमी करून त्यांना लुटले आहे. हा प्रकार केवळ एकाच ठिकाणी न करता तब्बल तीन ते चार तास वेगवेगळ्या ठिकाणी हा थरार सुरू होता. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीने या दोघांनाही पाठलाग करून जेरबंद केले आहे.


रात्री 12.30 वाजता : नितीन कंपनी जवळ…  चाकूने वार,  मोबाईल आणि पैसे घेऊन दोघे फरार


रात्री 12.40 वाजता : कॅडबरी जंक्शन जवळ दीपक विश्वकर्मा यांच्यावर चाकूने वार करून दोघे पळाले.


रात्री 12.45 वाजता : चीतळसर परिसरात … रशीद मुगले या रिक्षाचालकवर चाकूने वार


रात्री 1 वाजता : वर्तकनगर परिसरात संतोष यादव या वेतरवर चाकूने वार करून दोघांनी मोबाईल हिसकावला.


रात्री 1.10 वाजता : लोकमान्य परिसरात केशव पुजारी या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवून मोबाईल आणि पैसे चोरून दोघे पळाले.


सोमवारी रात्री एकामागे एक घडलेल्या या घटनांमुळे ठाणे पोलीस चांगलेच जागे झाले. या सर्व घटना केवळ दोन अल्पवयीन मुलांनी तडीस नेल्या होत्या. एका चाकूच्या सहाय्याने त्यांनी तब्बल पाच जणांना जखमी केले आणि त्यांच्याकडील मोबाईल आणि पैसे लुटले.


ज्या वेळी या घटना घडत होत्या त्यावेळी ठाणे पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये एकामागे एक फोन वाजत होते. अनेक ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली. वर्तकनगर येथील नाकाबंदीतून हे दोघे निसटण्यात यशस्वी झाले. मात्र चितळसर पोलिसांच्या हद्दीत येताच त्यांनी चोरी केलेली दुचाकी घसरली आणि पोलिसांनी त्यांना धावत पाठलाग करत पकडले.


ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना समजले की, यातील एक जण 16 तर दुसरा 17 वर्षाचा आहे. नवीन कपडे घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून आम्ही चोरी आणि लूट केल्याचे या दोघांनी कबूल केले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात त्यांनी दारू पिल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र त्यांनी दारू व्यतिरिक्त अजून कोणती नशा केली होती का? याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान त्यांना अल्पवयीन असल्याने बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.


इतक्या शुल्लक कारणासाठी जर अल्पवयीन मुले हातात चाकू घेऊन रस्त्यावर रक्ताचे पाट वाहणार असतील तर या पिढीला परिणामकारक समुपदेशनाची गरज आहे. पोलिसांनी देखील अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.


संबंधित बातम्या :