मुंबई : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचे गूढ आता हळूहळू उलगडत आहे. राजा रघुवंशीची हत्या त्याची पत्नी सोनमनेच केल्याचं स्पष्ट झालं. या हत्येनंतर सोनम मेघालयातून गाजीपूरला पळून गेली आणि दबावाखाली आत्मसमर्पण केले. राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
हनीमूनला गेलेला राजा बेपत्ता झाला आणि त्यानंतर पाच दिवसात त्याचा मृतदेहच हाती आला. पाच वर्षांनी लहान असलेल्या राज कुशावह नावाच्या बॉयफ्रेंडसाठी सोनमने तिच्या पतीच्या काटा काढला, तोही लग्न झाल्यानंतर अवघ्या 13 दिवसात. या प्रकरणाची टाईमलाईन कशी आहे ते पाहुयात,
तारीख- 10 मे 2025
राजा रघुवंशींचा सोनमसोबत विवाह झाला. त्यावेळी काढण्यात आलेल्या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या नव्या आयुष्याची सुरुवात त्यांनी केली खरी, पण हाच नवा प्रवास राजा रघुवंशीसाठी आयुष्याचा शेवट करणारा प्रवास ठरला.
तारीख- 20 मे 2025
दोघेही हनिमूनसाठी शिलाँगला रवाना झाले. शिलाँगला जायचे प्लॅनिंग सोनमने केलं होतं.
तारीख- 23 मे 2025
राजा आणि सोनमने मेघालयातील अनेक ठिकाणं पाहिली. सुरुवातीला दोघेही कुटुंबाच्या संपर्कात होते. या कपलने नोंग्रियाटच्या शिपारा होमस्टेमध्ये रात्री मुक्काम केला. या हॉटेलमधून चेकआऊट केल्यानंतर दोघेही बेपत्ता झाले.
खरं तर राजाच्या हत्येचा कट त्याची पत्नी सोनमने आधीच शिजवला होता. हनीमूनला जाण्याची तिकीटं सोनमने बुक केली होती. राजा रघुवंशीचे भाऊ त्याल म्हणाले होते, आता नको नंतर जाऊ. तरीही सोनमने तिकीट बुक केल्यामुळे दोघं हनीमूनला गेले. ठरल्याप्रमाणे सोनमने सुपारी देऊन राजाची हत्या केली आणि सोनम बेपत्ता झाली
तारीख- 2 जून 2025
मेघालयच्या एका धबधब्याजवळ राजाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्या हातावरचा टॅटू आणि हातातल्या स्मार्टवॉचमुळे त्याची ओळख पटली.
तारीख- 8 जून 2025
मेघालयमधून बेपत्ता झालेली सोनम थेट उत्तर प्रदेशच्या गाजीपूरमध्ये एका ढाब्यावर दिसली. वेळ होती जवळपास मध्यरात्री 1 वाजताची. सोनम गाजीपुरमधील एका ढाब्यावर घाबरलेल्या अवस्थेत पहायला मिळाली. आपल्या नवऱ्याची काही गुंडांनी हत्या केली असून माझं अपहरण करुन मला गाजीपूरमध्ये आणून सोडल्याची बतावणी तिने हॉटेल मालकाला केली. घरी एक फोन करायचा आहे असं सांगून हॉटेल मालकाच्या मोबाईलवरुन तिने फोनही केला. त्यानंतर हॉटेल मालकाने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी तिथून सोनमला ताब्यात घेतलं.
पोलिसी खाक्या दाखवताच सोनमने आपला गुन्हा मान्य केला. आपणच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचं सोनमने कबूल केलं.
Raja Raghuwanshi Murder Case : नोकरावर प्रेम, नवऱ्याचा गेम
- राज कुशवाह नावाच्या तरुणाशी सोनमचे प्रेमसंबंध होते.
- राज कुशवाह सोनमच्या वडिलांच्या प्लायवूड कारखान्यात कामाला होता.
- सोनम अकाउंट्स आणि स्टाफ मॅनेजमेंटशी संबंधित कामासाठी ऑफिसला यायची.
- याच काळात राज कुशवाह आणि सोनम यांच्यात जवळीक वाढली.
- सोनमच्या लग्नानंतरही राजसोबत तिचे प्रेमसंबंध कायम होते.
- प्रेमासाठी सोनमकडून पतीची हत्या करण्यात आली.
दुसरीकडे सोनमच्या कुटुंबाने आपली मुलगी निर्दोष असल्याचा दावा केला. या प्रकरणी मेघालय पोलिस खोटं बोलत असू आपल्या मुलीला अडकवलं जात असल्याचा आरोप सोनमच्या वडिलांनी केला. या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
लग्नाला महिनाही झाला नव्हता. तोवर या नात्याचा हा असा भयानक शेवट झाला. राजाची 'सोनम' बेवफा निघाली.