Crime News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) एका नेत्याने लॉजच्या रुममध्ये घुसून एका महिलेचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना सोलापुरात (Solapur Crime News) उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मनोहर सपाटे असं गुन्हा दाखल नेत्याचं नाव असून तो सोलापूरचा माजी महापौर देखील राहिला आहे. तो सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा सदस्य देखील आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महिला तक्रारदार या पुणे येथे वास्तव्यास असून त्या मूळच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील आहेत. गावातील शेतीच्या वादामुळे त्यांची एक कोर्ट केस सध्या सुरू आहे. या केससाठी त्यांना सोलापुरात वकिलांना भेटण्यासाठी यावे लागते. संबंधित महिला 14 जून रोजी माजी महापौर मनोहर सपाटे याच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये राहिल्या होत्या. 

महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न 

सुरुवातीचे दोन दिवस त्या रूम नंबर 202 मध्ये होत्या. नंतर पुढील दोन दिवस त्या रूम नंबर 205 मध्ये राहिल्या. 16 जूनच्या मध्यरात्री बाराच्या सुमारास मनोहर सपाटे याने रूमचा दरवाजा ठोठावून महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्याशी अश्लील हावभाव करीत विनयभंग केला. 

तू कुठेही तक्रार केली, तरीही मला काही फरक पडत नाही

यानंतर पीडित महिलेनं घाबरून तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात, असे का करता? असे म्हटले असता आरोपीनं अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तू कुठेही तक्रार केली, तरीही मला काही फरक पडत नाही. कारण माझे वय जास्त असल्यामुळे मला लगेच जामीन मिळतो, असेही आरोपीने म्हटल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर आरोपीने वारंवार मोबाईलवरून संपर्क करत पीडितेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह केला होता. पीडित महिला 24 जून रोजी वकिलांचा सल्ला घेण्यासाठी पुन्हा सोलापुरात आल्या. यावेळी महिलेला आरोपी सपाटेचा फोन आला. त्याने लॉजवरील रूम नंबर 307 वर येण्याचा आग्रह सुरु केला.

यापूर्वीही शिक्षिकाकडून तक्रार

यावेळी पीडित महिलेने 24 जूनला संध्याकाळी पीडितेनं रूम नं. 307 मध्ये जाऊन सपाटेंच्या कृत्याचे व्हिडीओ काढले. त्या व्हिडीओत सपाटे हा पीडितेसोबत अश्लील कृत्य करताना दिसून येत आहे. यानंतर महिलेने 25 जून रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनुसार मनोहर सपाटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, यापूर्वीही एका शिक्षिकेने मनोहर सपाटे याच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती.

आणखी वाचा

Sandipan Bhumare: संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची जमीन; हैदराबादमधील सालार जंग कुटुंबाकडून हिबानामा म्हणून भेट, संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात