Shraddha Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांडातील (Shraddha Walker Case) आरोपी आफताब पूनावालाची (Aftab Poonawalla) पॉलिग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एफएसएलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबाने पॉलिग्राफ चाचणीत आपला गुन्हा कबूल केला आहे. पॉलीग्राफ चाचणीच्या वेळीही आफताबच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती अथवा केलेल्या गुन्ह्याबद्दल पश्चाताप दिसत नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पॉलिग्राफ चाचणीच्या वेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आफताबने श्रद्धाची हत्या केली असल्याची बाब कबूल केली. खूप आधीच श्रद्धाची हत्या करायची होती, असेही त्याने म्हटले. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकले असल्याची कबुली आफताबने दिली. श्रद्धाशिवाय, इतर काही मुलींसोबत आपले संबंध होते याची कबुलीदेखील आफताबने दिली.
पॉलीग्राफ चाचणी करणाऱ्या तज्ज्ञांनी आफताबला काही प्रश्ने विचारली. या प्रश्नांना आफताबने अशा प्रकारे उत्तरे दिली.
प्रश्न- तुम्ही श्रद्धाची हत्या केली का?
आफताब- हो
प्रश्न- 18 मे रोजी हत्या झाली होती का?
आफताब- हो
प्रश्न- तुम्ही शरीराचे अवयव जंगलात फेकले का?
आफताब- हो
प्रश्न- तुम्ही श्रद्धाला मारण्याचा कट आधीच केला होता का?
आफताब- हो
प्रश्न- तुम्हाला श्रद्धाला मारल्याचा पश्चाताप होतोय का?
आफताब - नाही
प्रश्न- श्रद्धाला मारण्याच्या उद्देशाने तुम्ही तिला दिल्लीत आणले होते का?
आफताब- हो
प्रश्न- तुम्ही श्रद्धाची हत्या केल्याचे तुमच्या घरच्यांना माहीत होते का?
आफताब- नाही
आफताबने या दरम्यान, पोलिसांना हत्याकांडाशी निगडीत सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर, तज्ज्ञांकडून पॉलिग्राफ चाचणीचा अंतिम अहवाल तयार करण्यात येत आहे. हत्याकांडाशी निगडित अनेक गोष्टीचा उलगडा होण्यास या चाचणीची पोलिसांना मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे.
पॉलिग्राफ चाचणीनंतर आता आरोपी आफताबची गुरुवारी, एक डिसेंबर रोजी नार्को चाचणी होणार आहे. पॉलिग्राफ चाचणी आधी आफताबची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती.
दरम्यान, श्रद्धा हत्याकांडाच्या तपासाच्या अनुषंगाने दिल्ली पोलिसांचे एक पथक वसईमध्ये येऊन गेले. यावेळी त्यांनी आफताब आणि श्रद्धाचे नातेवाईक, परिचीत, मित्र-मैत्रिणींची चौकशी केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या: