Buldhana News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) धामधुमीत प्रशासन व्यस्त असताना बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलढाणा शहरातील (Buldhana News) मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ब्रिटिशकालीन अध्यापक महाविद्यालयाच्या वस्तीगृहाची इमारत अज्ञात इसमाने जमीनदोस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे ही इमारत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असताना हा प्रकार घडला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा पोलीस (Buldhana Police) स्थानकात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यक्तीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.  


ब्रिटिशकालीन वसतिगृह एकाच दिवसात जमीनदोस्त


बुलढाणा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शासकीय अध्यापक महाविद्यालयाची ब्रिटिशकालीन वसतीगृह एक अज्ञात इसमाने वसतीगृहाच्या वॉल कंपाऊंडसह तोडफोड करून जमीनदोस्त केलीय. धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय आणि  जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या महाविद्यालयाच्या वस्तीगृहाची इमारत एकाच दिवसात जमीनदोस्त केली आहे. मात्र याची खबरही प्रशासनाला नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे शासनाचं तब्बल दीड कोटी रुपयांचे नुकसान झालंय. मात्र ही इमारत तोडण्यामागील नेमका उद्देश काय आणि ही इमारत कोणी तोडली या बाबतची माहितीही अद्याप पुढे आलेली नाही. याप्रकरणी काल, 4 एप्रिलला शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल


दोनशे विद्यार्थी क्षमता असलेलं हे वसतीगृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन एकर जागेत बांधलेले होत. जिल्हा पोलीस मुख्यालया शेजारी असूनही अज्ञात इसमान पक्की असलेली शासकीय इमारत तोडल्याची धक्कादायक घटना घडूनही या बाबतीत कुणालाही माहिती नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त होत असून अनेक सवालही या निमित्याने उपस्थित होत आहेत.  ब्रिटिशकालीन बांधणीचे भक्कम वसतिगृह एकाच दिवसात पाडलं गेलं याची कुणालाही माहिती कशी नाही, अध्यापक महाविद्यालय प्रशासन इमारत पडताना काय करत होते, हा भूखंड लाटण्याचा प्रकार तर कोणी करत नाहीना, पोलीस मुख्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी असताना इमारत पडताना कुणीही कसं बघितलं नाही, असे अनेक प्रश्न या निमित्याने उपस्थित करण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


नागपूर विमानतळावर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई, 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त