मुंबईः नुपूर शर्माच्या वादग्रस्त व्हिडीओला समर्थन देणाऱ्या अमरावती येथील औषध व्यापारी उमेश कोल्हे यांची अमरावतीत हत्या करण्यात आली होती. या हत्येतील आरोपी शाहरुख पठान हा मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात असून त्याच्यावर इतर कैद्यांनी चांगलाच हल्ला चढवला होता. यामध्ये आता नवीन माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे स्वतः शाहरुखनेच इतर कैद्यांना स्वतःवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहीत केल्याची माहिती आहे. या प्रकरणी एनएम जोशी रोड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे एकाच बराकमध्ये राहणाऱ्या आरोपींनी शाहरुखवर हल्ला करत त्याला मारहाण केली होती. या घटनेनंतर सर्व कैद्यांना वेगवेगळ्या बारकमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. कोल्हे हत्याकांड प्रकरणात एनआयएने 7 लोकांना अटक केली असून सर्व आरोपी आर्थर रोड कारागृहात बंदीस्त आहेत. उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपी ऑर्थर रोड कारागृहात बराक क्रमांक 7 मध्ये बंद आहेत. नुपूर शर्मा हिच्या पोस्टला समर्थन केल्याप्रकरणी या आरोपींकडून कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेबद्दल जेव्हा शाहरुखने इतर कैद्यांना सांगितले तेव्हा कल्पेश पटेल, हेमंत मनेरिया, अरविंद यादव, श्रावण आवड आणि संदीप जाधव यांनी शाहरुख पठान वर हल्ला चढवला. घटनेनंतर कारागृह प्रशासनाने सर्व कैद्यांना वेगवेगळ्या बराकमध्ये स्थलांतरीत केले.


कारागृहात शाहरुखचे षडयंत्र!


कारागृहातील हल्ल्यानंतर पोलिसांनी शाहरुखने दिलेल्या कारणांची फेरतपासणी सुरु केली. यात वेगळीच माहिती समोर येत असून कारागृहातील घटनेद्वारे शाहरुखला समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच वेगळे बराक मिळविण्यासाठी शाहरुख हा मुद्दाम मारामारी करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलीस सर्व बाजूंनी घटनेचा तपास करत आहे.


Shahrukh Pathan Attacked: उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीवर कारागृहात जीवघेणा हल्ला


हल्लेखोरांवर गुन्हे दाखल


मुंबई पोलिसांनी भादंवी कलम 149, 143, 146, 323 अंतर्गत पाचही कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कारागृहात झालेल्या मारहाणीनंतर शाहरुखला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेसंदर्भात पोलीस पुढील तपास करत आहेत.