Sexual Assault Case After Break-Up : पुरुष आणि महिलेचे प्रेम संबंध असताना लग्नाचे दिलेले वचन मोडले किंवा पूर्ण केलं नाही, तर पुरुषावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. पुरुष आणि महिलेचे सहमतीने प्रेमसंबंध असताना ब्रेकअप झालं, तर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देताना हे सांगितलं आहे. पुरुष आणि महिलेचे प्रेमसंबंध परस्पर सहमतीने असतील आणि त्यानंतर ब्रेकअप झाल्यामुळे लग्न करण्याचं वचन पूर्ण केलं नसता, पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही
प्रियकराने लग्नाचे वचन देऊन वारंवार बलात्कार केल्याची तक्रार महिलेने केली होती. या प्रकरणात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने तरुणाला दिलासा दिला आहे. परस्पर सहमतीने रिलेशनशिप राहणाऱ्या जोडप्यांमध्ये ब्रेकअप झाले म्हणून एखाद्या पुरुषाविरोधात फौजदारी खटला चालवला जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय देत सर्वोच्च न्यायालयाने एका तरुणाला मोठा दिलासा दिला आहे. लग्नाचे दिलेले वचन मोडले किंवा लग्नाचे आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून एखाद्या पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
आपल्याला लग्न करण्याचे वचन देऊन ते पूर्ण न केल्याने एका महिलेने 2019 मध्ये प्रियकराविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. याविरोधात संबंधित तरुणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. ब्रेकअपमुळे सहमतीने रिलेशनशिप राहणाऱ्या कपलमध्ये फौजदारी कारवाई केली जाऊ शकत नाही. जेव्हा रिलेशनशिप विवाहापर्यंत पोहोचत नाही, तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात पुरुष आणि महिलेतील सहमतीने झालेल्या संबंधांना गुन्हेगारी रंग दिला जाऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं नमूद केलं आहे. बार ऍण्ड बेंचने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
काय आहे प्रकरण?
एका महिलेने 2019 मध्ये प्रियकराविरोधाल लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. प्रियकराने तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याचा आरोप केला होता आणि तसं न केल्यास महिलेच्या कुटुंबीयांना नुकसान पोहोचवण्याची धमकी आरोपीने दिली होती, असं महिलेने म्हटलं होतं. महिलेच्या तक्रारीनंतर आरोपी प्रियकराविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याविरोधात आरोपीने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, मात्र ती याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. यानंतर तरुणाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत तरुणाला दिलासा दिला आणि न्यायालयाने हा खटलाच रद्द केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :