पुणे: भाजपचे नेते आणि विधानपरिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सादवा वाघ (वय 55 वर्षे) यांचं अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार काल सोमवारी घडला आहे. सतीश वाघ (Satish Wagh) यांचा काल (सोमवारी दि. 9) सायंकाळी सातच्या सुमारास उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात निर्जनस्थळी मृतदेह आढळला. सकाळी सव्वासहाच्या सुमारास सतीश वाघ हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते, त्याचवेळी फुरसुंगी फाटा परिसरातून नंबरप्लेट नसलेल्या एका चारचाकी गाडीतून आलेल्या चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी सतीश वाघ (Satish Wagh) यांचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर काही तासांमध्येच सतीश वाघ यांचा अपहरणकर्त्यांनी खून केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नेमक्या कोणत्या कारणातून त्यांचा जीव घेण्यात आला, हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान या घटनेला 24 तास उलटून देखील अद्याप अपहरणकर्त्यांचा शोध लागला नाही. पोलिसांची वेगवेगळी पथकं तपास करत आहेत. (Satish Wagh Murder Case Update)


24 तास उलटून देखील अपहरणकर्त्यांचा शोध लागला नाही. पोलिस या घटनेचा वेगवेगळ्या अँगलने तपास करत असल्याची माहिती आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे, मात्र गाडीची नंबरप्लेट नसल्याने अडथळे निर्माण होत आहेत. तर पोलिस आरोपींचा  कसून शोध घेत आहेत. काल सोमवारी सकाळी सतीश वाघ यांची सकाळी चालण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात निर्जनस्थळी त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांची 8 पथक राज्यातील विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहेत. या घटनेने पुणे पुन्हा हादरलं आहे. या घटनेला जवळपास 24 तास उलटले आहेत. अद्याप पोलिसांना यश आलेलं नाही.


घटनेबाबत पोलिस काय म्हणाले?


आमदार योगेश टिळेकर हे सोमवारी सकाळी मॉर्निंग वॉकच्या वेळी चार ते पाच जणांनी एका चारचाकी गाडीतून यांचे अपहरण केले होते. सायंकाळी शिंदवणे घाट परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त ए राजा यांनी दिली आहे. तर सतीश वाघ यांच्या शरीरावर दांड्याने मारल्याचा खुणा आहेत. या मारहाणीतच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. शिवाय अपहरणानंतर सकाळीच वाघ यांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


काय आहे अपहरण आणि हत्येमागचं कारण?


सतीश वाघ यांची लोणी काळभोर परिसरातील माळीमळा येथे वडिलोपार्जित शेती आहे. ती शेती सतीश वाघ करतात. या शेतातील एक एकराबाबत दिवाणी न्यायालयात खटला सुरू आहे. त्याची सुनावणी सुरू आहे, दाखल फिर्यादीत नमूद केल्यानुसार सतीश वाघ यांनी दहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीला तीस ते पस्तीस लाख रुपये जमिनीच्या व्यवहारासाठी दिले होते व पैसे परत मिळत नसल्याने वडील (सतीश वाघ) हे वारंवार कॉल करत असल्याचे ओंकार वाघ यांनी त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. किंवा या व्यतिरिक्त अन्य कोणतं वैयक्तिक कारण आहे का याचा पोलिस तपास करत आहेत. पुण्यातील या घटनेने पुन्हा खळबळ उडाली आहे.