बीड : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून नागपूरमधील हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजलं. हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना लक्ष्य केले. सरपंच देशमुख यांची हत्या आणि वाल्मिक कराड यांचा संबंध काय आहे ते पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून. 


केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि नंतर त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह मराठवाडा हादरला. सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही नेते मसाजोग गावामध्ये दाखल झाले आणि हे प्रकरण चर्चेत आलं. 


एकीकडे संतोष देशमुख यांची हत्या झाली असताना या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना थेट विरोधकांनी लक्ष्य केले. घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोग गाव गाठले. देशमुख कुटुंबीयांच सांत्वन करत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना लक्ष केले. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा माणूस असून त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत. या प्रकरणातही त्याचा हात असून त्याला अटक झालीच पाहिजे अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. 


Who Is Walmik Karad : वाल्मिक कराड कोण?


वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत आहेत. परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार कराड पाहतात.


धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतात. 


यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात खंडनीशी संबंधित केज पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपात धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचे देखील नाव वारंवार घेतले जात आहे.


या प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो. वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप पहायला मिळत आहे. 


विरोधी नेत्यांचा वाल्मिक कराडांवर आरोप


विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खासदार बजरंग सोनवणे, छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस, खासदार रजनी पाटील यासह सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांनी मस्साजोग गावात रीघ लावली. रोहित पवारांनी थेट वाल्मिक कराड यांचे नाव घेऊन दोन कोटींची खंडणी मागितली असा आरोप केला.


विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबांची भेट घेत सांत्वन केले. यादरम्यान या प्रकरणात केवळ दोषी आरोपी नाही तर पोलिसांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अंबादास दानवे यांनी प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली.


छत्रपती संभाजीराजे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या वाल्मीक कराड यांना लक्ष्य केले. त्यामुळे केवळ चौकशी नाही, पोलिसांचे निलंबन नाही तर मुख्य सूत्रधाराला अटक व्हावा असं त्यांनी म्हटलं आहे. 


पोलिस वाल्मिक कराडांवर काय कारवाई करणार? 


या संपूर्ण प्रकरणात केज पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल असून यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यात अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला आज अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तैनात असून राज्यासह परराज्यात आरोपींचा शोध यांच्या माध्यमातून घेतला जात आहे. 


या प्रकरणात पोलिसांनी तपास गतिमान केला असून आरोपींची धरपकड सुरू आहे. जर यात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा सहभाग आढळल्यास पोलिस नेमकी काय कारवाई करणारयाकडेच सर्वांचे लक्ष आहे.


ही बातमी वाचा: