मुंबई :  मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र हादरला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सीआयडीनं या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामधून संतोष देशमुख यांना कशा पद्धतीनं मारहाण करण्यात आली या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओची माहिती समोर आली आहे. मारहाण केल्यानंतर संतोष देशमुख यांच्यासोबत आरोपीनं फोटो आणि व्हिडिओ देखील काढल्याचं पाहायला मिळालं. या फोटोंमधून आरोपींनी त्यावेळी क्रौर्याची परिसीमा गाठल्याचं पाहायला मिळतं. सीआयडीला हे सर्व पुरावे आरोपी महेश केदार याच्या फोनमधून जप्त केले आहेत. 

संतोष देशमुख यांच्या मारहाणीचं व्हिडिओ चित्रीकरण

सीआयडीनं आरोपींचे काही मोबाईल हस्तगत केले होते. सीआयडीनं पाच मोबाईल हस्तगत केले होते.  त्यातला एक फोन केदार नावाच्या आरोपीचा होता. महेश केदारच्या मोबाईलचं स्क्रीन लॉक उघडलं तेव्हा सीआयडीला  15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढल्याचे समोर आलं आहे. सध्या समोर आलेले फोटो हे व्हिडिओतून घेण्यात आलेले आहेत, अशी माहिती आहेत. सीआयडीला या तपासात केवळ फोटो आणि व्हिडिओसह ऑडिओ क्लीप देखील मिळाल्याची माहिती आहे. 

कृष्णा आंधळे का सापडत नाही: सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर ही संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडलं ते माणुसकीला लाजवणारी घटना आहे, असं म्हटलं. संतोष देशमुख यांचे भाऊ, पत्नी, मुलगी, आई हे  सगळं पहिल्या दिवसापासून बघत आहेत. देशमुख कुटुंबाच्या दु:खात कोणीतरी लक्ष घालावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगची हिम्मत कशी होते? कुठली तरी राजकीय ताकद असल्याशिवाय हे होणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

जेव्हा या सगळ्या घटना बीडमध्ये घडत होत्या, संतोष देशमुखची हत्या असेल, महादेव मुंडे यांची हत्या असेल, या सगळ्या हत्या होत असताना सरकारची यंत्रणा कुणाला लपवत होती. ती यंत्रणा बीड जिल्ह्यात कोण चालवत होतं याचं उत्तर राज्य सरकारनं द्यायला हवं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. 

वाल्मिक कराडवर अनेक एफआयआर होते. दोन प्रकरणातून त्याची नावं वगळण्यात आली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आरोपींचे सीडीआर का मिळत नाही. कृष्णा आंधळे गायब आहे, त्याचा सीडीआर का काढला जात नाही. सातवा खुनी 75 दिवस का सापडत नाहीत. तो का फरार आहे? यांच्या मागं कुणाची यंत्रणा होती, हा कुणाचा माणूस होता, कोण त्यांना ताकद देत होतं, याचं उत्तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

इतर बातम्या :

धनंजय मुंडेंचा राजीनामा अटळ? अजित पवार अन् देवेंद्र फडणवीसांसोबत रात्री दोन तास बैठक, देवगिरी बंगल्यावर काय घडलं?