बारामती: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि त्याच्या सहकाऱ्यांना फाशी व्हावी, या मागणीसाठी रविवारी बारामतीमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder case) यांची कन्या वैभवी देशमुख उपस्थित होती. यावेळी वैभवी देशमुख ही भावूक झाली होती. माझ्या बाबांचा गुन्हा काय होता, असा सवाल वैभवीने उपस्थितांना विचारला.
यावेळी वैभवी देशमुख हिने तिचे वडील किती संवेदनशील आणि हळव्या मनाचे होते, याबद्दलचा एक किस्सा सांगितला. वैभवी म्हणाली की, आमचं घर माळकऱ्यांचं आहे. एकदा आमच्या घरात मुंग्या झाल्या होत्या. मात्र, माझ्या वडिलांनी माझ्या आईला त्या मुंग्यांवर पावडर टाकून दिली नाही. भिंतीवर चिकटपट्टी लावून त्यांनी मुंग्या खाली येण्यापासून थांबवल्या. एवढ्या संवेदनशील मनाचे माझे वडील होते, असे वैभवी देशमुख हिने भावूक होत सांगितले.
मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायची भीक मागत आहे. 28 मे 2024 रोजी या घटनेची सुरुवात झाली. सुरुवातीला आवादा कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे अपहरण झाले. कंपनीने 29 मे रोजी गुन्हा दाखल केला. या अधिकाऱ्याचे अपहरण दोघांनी केले होते. मात्र, पोलिसांनी फक्त एकावरच गुन्हा दाखल केला. पुढे या प्रकरणाचा तपास झाला नाही. त्यामुळे आरोपींना आपल्याला काहीही होणार नाही, असा आत्मविश्वास आला. वाल्मिक कराड यानेच यासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या होत्या. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली नाही तर उद्या राज्यात एखाद्याला रस्त्याने जाताना धक्का लागला तरी खून होतील, अशी भीती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.
धनंजय देशमुख यांचे गंभीर आरोप
संतोष देशमुख हत्याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला. आठ जण आवादा कंपनीत आले होते. परत एकास अमानुषपणे मारण्यास सुरुवात केली. गावातील एकाने संतोष देशमुख यांना फोन केला. तेव्हा ते आवादा कंपनीत भांडण सोडवायला गेले. त्याविरोधात अशोक सोनावणे हा पोलिसात तक्रार देण्यासाठी भीक मागत होता. पण राजकीय पाठबळामुळे सोनावणे याची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली नाही. आताही बीडमध्ये दहशतीचे वातावरण आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासात अजूनही राजकीय हस्तक्षेप सुरु आहे. मी याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून माहिती देणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले.
आणखी वाचा