संगमनेर : संगमनेर शहरातील बस स्थानकात उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये गळफास लावून घेत बसचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. 50 वर्षीय सुभाष शिवलिंग तेलोरे हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कोल्हार कोलूबाईचे असून काल मुक्कामी ड्युटीवर आल्यावर आज सकाळी त्यांनी हे टोकाच पाऊल उचलले आहे. 


कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या जवळ आढळून आलेल्या चिठ्ठीवरून दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले असून चिठ्ठीत कोणाचेही नाव अगर कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचेही त्यांनी नमूद केलय.


काल सोमवारी पाथर्डीहुन नाशिककडे प्रवाशी घेऊन निघालेली बस संगमनेर स्थानकात पोहचली. त्याठिकाणी डिझेल उपलब्ध नसल्याने नाशिकला न जाता संगमनेरमध्येच मुक्काम करण्याची वेळ चालक व वाहकावर आली. मात्र, आज पहाटे पाचच्या सुमारास वाहनचालक तेलोरे आपल्या अन्य सहकाऱ्यांसह कामावर जाण्यासाठी तयार झाले. चालक व वाहक फ्रेश होण्यासाठी एकत्र गेले आणि सुभाष तलोरे लवकर बसमध्ये परतले त्यापाठोपाठ वाहक फ्रेश होऊन बस जवळ आले व बसमध्ये चढताच समोर सुभाष तलोरे यांचा बसमध्ये फास लावून लटकलेला मृतदेह पाहून त्याना धक्काच बसला.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोलिसांना चिठ्ठी मिळाली आहे. त्यामध्ये सुमारे साडेसहा लाख रुपयांचे कर्ज असल्याचा व त्याला कंटाळल्याचा उल्लेख आहे. मात्र, यामध्ये कोणालाही जबाबदार धरणारा नमोल्लेख पोलिसांना आढळून आला नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली असून कुटुंबाकडे चौकशी झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


दरम्यान या प्रकरणी मृत सुभाष यांच्या भावाने बोलण्यास नकार दिलाय. महिनाभरापूर्वी धुळे येथील एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर राज्यसरकारने मदतही जाहित केली. मात्र, आज कर्जबाजारीपणामुळे पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं आव्हान सरकार समोर उभं राहिलय हे मात्र नक्की.