Rupali Patil Thombare on Rupali Chakankar: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने आता गंभीर आणि व्यापक स्वरूप धारण केले असून, त्याचे पडसाद थेट राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरातला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, तपास यंत्रणांनी चौकशीची व्याप्ती वाढवत प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. या प्रकरणात नाशिकमधील या भोंदूबाबाशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. विरोधकांच्या तीव्र दबावानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेत अखेर पदाचा राजीनामा दिला. आता या प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
Rupali Patil Thombare on Rupali Chakankar: दर पंधरा दिवसांनी त्या नाशिकला जात होत्या
रूपाली पाटील ठोंबरे यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, विकृत कृत्य करणाऱ्या बाईचा गुरु हा भोंदू बाबा आहे आणि दर पंधरा दिवसांनी त्या नाशिकला जात होत्या. दर पंधरा दिवसांनी त्यांना पप्पा म्हणत होत्या, डॅडी म्हणत होत्या, शुगर डॅडी म्हणत होत्या, याबाबत मला माहिती नाही. कुठल्या बाईने कुठे फिरावे? कोणाशी बोलावे? याचे वैयक्तिक स्वातंत्र्य असले तरी देखील संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने वागणे गरजेचे असते, अशी टीका त्यांनी केली.
Rupali Patil Thombare on Rupali Chakankar: अगं बाई तू वेडी आहेस का?
रुपाली पाटील ठोंबरे पुढे म्हणाल्या की, त्यांना जनाची नाही तर बाई म्हणून मनाची देखील लाज नाही, हे कालच्या राजीनामा देतानाच्या फोटोवरून दिसून आले. हसत आहेत, कुठलं वैयक्तिक कारण होतं? अगं वेडी आहेस का बाई तू? मनोरुग्ण आहेस का? कुठला नरेटीव्ह सेट करत आहेस? कुठले वैयक्तिक कारण? त्या भोंदूबाबाचे पाय तुझ्या नवऱ्याला लाव. आम्हाला काही देणंघेणं नाही. परंतु, महत्त्वाच्या पदावर बसून जो बालिशपणा चाललेला आहे तो हा महाराष्ट्र सहन करणार नाही, असे देखील त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
