Rohini Khadse Pranjal Khewalkar: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांच्या विरोधात बीडमधील एका संस्थेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. प्रज्ञा खोसरे यांच्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेकडून ही तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीत प्रांजल खेवलकर यांनी खराडी भागातील ते हॉटेल 28 वेळा बुक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच प्रांजल खेवलकर यांनी या हॉटेलमध्ये अनेकवेळा मुलींना बोलावल्याचा आरोपही या संस्थेकडून केला आहे. आता सदर आरोपावर रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रोहिणी खडसे ट्विट करत काय म्हणाल्या?
प्रांजल खेवलकर यांनी या हॉटेलमध्ये अनेकवेळा मुलींना बोलावल्याचा आरोपवर रोहिणी खडसेंनी एक्सवर पोस्ट करत तीन महत्वाचे मुद्दे मांडले. रोहिणी खसडे नेमकं काय म्हणाल्या, जाणून घ्या...
नुकतेच माध्यमांतून महिला आयोगाने डॉ. खेवलकर यांच्या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांना दिलेले पत्र वाचले.
मुद्दा क्र. १ ज्या सानवी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेने या प्रकरणात राज्य महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. ती संस्था राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला विभागाच्या बीड जिल्ह्याची अध्यक्षा प्रज्ञा खोसरे यांची आहे.
मुद्दा क्र. २ राज्यात महिलांच्या विरोधात इतके प्रकरण घडले, वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणासारखे हुंडाबळीचे प्रकरण घडले. यात खुद्द अजित पवार गटाच्या पुण्यातील महत्त्वाचे पदाधिकारी आरोपी आहेत. तेव्हा ही संस्था कुठे होती ? राज्यात महिलांवर इतके अत्याचार होतात तेव्हा ही संस्था कुठे होती ? मग आताच ही संस्था बाहेर कशी काढली गेली ?
मुद्दा क्र. ३ राज्यातील अत्याचारग्रस्त महिलांची साधी विचारपूसही न करणाऱ्याला महिला आयोग अध्यक्षांना आज अचानक कसे कर्तव्य आठवले ? इतके कसे कार्यतत्पर झाले ?
आपलाच बॉल, आपलीच बॅट आणि आपणच सिक्सर मारणार...सगळं व्यवस्थित स्क्रीप्टनुसार सुरू आहे, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.
प्रांजल खेवलकरांविरोधातल्या तक्रारीत काय?
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास कु. सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. सदर अर्जदाराने अर्जात, पुण्यात ज्या रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आला त्यातील आरोपी श्री. प्रांजल खेवलकर यांनी 28 वेळा स्वतःच्या नावांने हॉटेल रुम बुक करुन अनेक वेळा परप्रांतीय मुलींना आमिष दाखवून बोलावल्याचे रॅकेट दिसून येत आहे. सदर प्रकरण संघटित गुन्हेगारीचे तसेच मानवी तस्करीचे असल्याचा संशय अर्जदाराने व्यक्त करत या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कार्यवाही व्हावी असे नमूद केले आहे. आयोगाने पोलिस आयुक्त, पुणे यांना सदर प्रकरणाची मानवी तस्करी विरोधी पथक, सायबर विभाग यांचे मार्फत तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.