राजापूर, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील भू गावातील कुंभारवाडी येथे राहणाऱ्या एका बावीस वर्षे युवकाने व्यसनामुळे झालेल्या भांडणातूनच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ऋषिकेश सुरेश कुंभार असे या युवकाचे नाव आहे.


राजापूर तालुक्यात भू गावातील कुंभारवाडी येथे राहणारा ऋषिकेश सुरेश कुंभार याला दारूचे व्यसन होते. त्या दारूच्या व्यसनावरून 6 ऑगस्ट रोजी त्याचे रात्री नऊ वाजल्यानंतर उशिराच्या सुमारास घरी वडिलांजवळ भांडण झाले. वडिलांजवळ झालेल्या भांडणाचा डोक्यात राग धरून त्याने टोकाचे पाऊल उचलत रागाच्या भरात विषारी औषध प्राशन केले. बागेतील गवत फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. 


अत्यवस्थ झालेल्या ऋषिकेशला घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मदत करून तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनल्याने त्याला तातडीने मुंबईला नायर रुग्णालयात पुढील उपचारांकरता दाखल करण्यात आले. ऋषिकेश हा लाँचवर मासेमारीसाठी काम करायचा अशातच आपल्या घरातील मुलाने आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 


मुंबई येथील नायर रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना ऋषिकेश याने नायर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. अवघे 22 वर्षे वय असलेल्या या युवकाने टोकाचे पाऊल उचलत विष पिऊन आत्महत्या केल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या सगळ्या प्रकाराची नोंद मुंबई येथून राजापूर पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आली आहे.  या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.


मागील काही काळात वडील, पालकांनी विविध कारणांनी रागावल्याने युवकांचे त्यांच्यासोबत कडाक्याचे भांडण होत आहेत. यातूनच टोकाचे पाऊल उचलण्याच्या घटना घडत आहेत. समाजात होत असलेल्या या बदलामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.


लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर प्राणघातक हल्ला


लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला प्राणास मुकावे लागले असते. एका किरकोळ वादातून या तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लांजा तालुक्यातील कुरणे पडयेवाडी येथे काही दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली. लग्नाची बोलणी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर किरकोळ वादातून कोयतीने वार करून त्याला जखमी केल्याची घटना घडली. या प्रकरणी 46 वर्षीय व्यक्तीवर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.