नवी दिल्ली: पुण्यातील गाजलेल्या राठी मर्डर केसमध्ये (Rathi Murder Case Pune) एक मोठी अपडेट आली आहे. गुन्हा ज्यावेळी घडला होता त्यावेळी आरोपी हा अल्पवयीन होता हे सिद्ध झाल्यानं न्यायालयाने या प्रकरणातील आरोपीला तात्काळ सोडण्याचे आदेश दिले आहेत. नारायण चेतनराम चौधरी असं या आरोपीचं नाव असून त्याने 28 वर्षे तुरुंगात घालवली आहेत. आज त्या आरोपीला सोडण्याचे आदेश दिले आहेत. 


फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला दोषी नारायण चेतनराम चौधरी हा या गुन्ह्याच्या वेळी केवळ 12 वर्षांचा असल्याने त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती केएम जोसेफ आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने आरोपी हा गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दावा योग्य असल्याचा निष्कर्ष काढल्यानंतर सोमवारी आरोपीला सोडण्याचे आदेश दिले.


नारायण चेतनराम चौधरी याने या प्रकरणात 28 वर्षे शिक्षा भोगली आहे. 1994 साली पुण्यातील राठी कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये दोन मुलं आणि एका गर्भवती स्त्रीचा समावेश होता. 


हा खटला सुरू असताना आरोपी नारायण चेतनराम चौधरी याचं वय 20 ते 22 असल्याचं नोंद करण्यात आलं होतं. त्या खटल्यात आरोपी चौधरी आणि त्याच्या दोन साथिदारांपैकी एक साथिदार जितेंद्र गेहलोत याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. जितेंद्र गेहलोतची फाशीची शिक्षा ही जन्मठेपेत बदलण्यात आली. नारायण चौधरीने आपला दयेचा अर्ज मागे घेतला आणि गुन्हा घडला त्यावेळी आपण अल्पवयीन होतो असं सांगत एक पुनर्विचार याचिका दाखल केली.


नारायण चौधरीचे राजस्थानमधील त्याच्या शाळेतील जन्मदाखल्याची नोंद तपासण्यात आली. त्यामध्ये तो अल्पवयीन होता हे सिद्ध झालं. पण तो त्याचे वय सिद्ध करू शकला नाही कारण हा गुन्हा महाराष्ट्रात घडला होता आणि महाराष्ट्रात त्याने केवळ दीड वर्षे शिक्षण घेतलं होतं.


जानेवारी 2019 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने पुण्याच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांना चौधरी याचे वय तपासण्याचे निर्देश दिले. पुण्याच्या सत्र न्यायालयाने त्यांचा अहवाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा आरोपी गुन्हा घडला त्यावेळी अल्पवयीन असल्याचं सांगत त्याची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. 


ही बातमी वाचा :