रायगड : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशिर येथे एकाच कुटुंबातील आई, वडील आणि आठ वर्षीय मुलगा अशी तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तिहेरी हत्याकांडातील महिला सात महिन्याची गरोदर असल्याची माहिती देखील समोर आली. ऐन गणेशोत्सवाच्या सणात घडलेल्या या हत्याकांडामुळे रायगड जिल्हा हादरला आहे.
पोशिर गावातील चिकनपाडा या गावात आज एका मृत व्यक्तीची दशक्रिया विधी सुरू असताना नदीवर गेलेल्या ग्रामस्थांना पाणी वाहणाऱ्या नाल्यात एक आठ वर्षीय मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यांनंतर या तिहेरी हत्याकांडाची घटना समोर आली.
बनाव रचत बुडून मृत्यू झाल्याचा संशय निर्माण केला
या घटनेत एक 35 वर्षीय मदन जैतू पाटील, पत्नी अनिशा मदन पाटील, त्यांचा आठ वर्षीय मुलगा विवेक मदन पाटील अशी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या तिघांच्या मृतदेहावर धारदार शस्त्राचे वार केल्याचे दिसत आहेत. यावरून आरोपीने बनाव रचत पाण्यात बुडल्याचा संशय येण्यासाठी हा खेळ रचला असावा असा प्राथमिक अंदाज कर्जत पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिवाय पाटील कुटुंबाच्या राहत्या घराच्या मागच्या बाजूस वाहणाऱ्या नाल्यात या आरोपींने हे मृतदेह टाकले होते.
या घटनेस्थळी आता नेरळ, कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी पोहचले आहेत. तर कर्जत खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी देखील दाखल झालेत. एकीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना घडलेली घटना दुर्देवी असून परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे.
ही बातमी वाचा: