Pune Nasrapur Case: पुण्यातील (Pune News) नसरापुरात (Nasrapur Case) घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं अख्खा देश हादरला होता. या प्रकरणात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (65) याला विशेष न्यायालयानं गुरुवारी दोषी ठरवलं. आरोपीनं केलेलं कृत्य अत्यंत घृणास्पद, क्रूर आणि समाजमन हादरविणारं असून, हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मीळ स्वरूपाचा असल्याचं नमूद करत सरकारी पक्षानं आरोपीला फाशीची शिक्षा केल्याचं सांगण्यात आलं होतं.

Continues below advertisement

न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून खटल्याचा निकाल राखून ठेवलेला. अखेर दोषी असलेल्या भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. अखेर राज्याच्या इतिहासामध्ये अवघ्या 58 दिवसांत खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन निकालावर शिक्कामोर्तब झाला. यावर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. नसरापूर प्रकरणाचा आधार घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केतन अग्रवाल प्रकरणसुद्धा फास्ट ट्रॅकवर घेऊन निकाल लावू, अशी ग्वाही दिली आहे. 

नसरापूरचा दोषी भीमराव कांबळेला तात्काळ फाशी दिली जाईल... : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी सर्वात आधी न्यायालयाचं आणि न्यायाधीशांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. एक अतिशय अमानवीय निर्घृण अशा प्रकारच्या हत्या आणि अत्याचार लहान बच्चू बरोबर केलाय. नसरापूरच्या आरोपीला आज फाशीची शिक्षा सुनावलीय. त्याबद्दल मी मनापासून पोलिसांचं अभिनंदन करतो, पोलिसांनी देखील दोन आठवड्यांच्या आतमध्ये चार्जशीट दाखल केलीय आणि यातील कोणताही पुरावा सोडला नाही, त्यांनी सर्व पुरावे न्यायालयासमोर मांडलेत. त्यानंतर न्यायालयानं देखील त्यांच्यावर रिअरेस्ट ऑफ रिअरेस्ट केस अशा प्रकारची ही केस असल्याचं संबोधलं आहे, त्याचबरोबर या नसरापूरचा दोषी भीमराव कांबळे नावाच्या नराधमाला फाशीची शिक्षा झालेली आहे, आता तात्काळ त्याला फाशी दिली जाईल. त्यामुळे समाजामध्ये गुन्हेगारांवर वचक बसेल, पुन्हा अशा प्रकारचे कृत्य करण्याचं धाडस कोणी करणार नाही, अशा वृत्तीला ठेचून काढून टाकलं पाहिजे. ही भूमिका समाजाची होती आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णय हा पुढच्या होणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालणारा ठरेल. मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही अभिनंदन करतो, तेही सातत्यानं ही केस मॉनिटर करत होते, माझी देखील पोलिसांशी, एसपींशी आणि तपास अधिकाऱ्यांशी सातत्यानं चर्चा होत होती, एसपी, आदी पोलीस अधिकारी आणि संपूर्ण तपास कामे करणारी यंत्रणा यांचं हे सगळं कौतुकास्पद काम आहे, त्या सगळ्याचं मी अभिनंदन करतो, सरकारी वकिलांचं देखील मी अभिनंदन करतो, अतिशय योग्य पद्धतीनं केस मांडलीय आणि अखेर आरोपीला फाशीची शिक्षा अखेर झाली..."

Continues below advertisement

"केतन अग्रवालसारख्या ज्या केसेस आहेत, ज्यामध्ये इंटेनशन ठेवून (नियोजित कट करुन)  हत्या असेल किंवा रेप असेल, अशा गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी अशा केसेस फास्ट ट्रॅकवर घेऊ आणि त्याचा निकाल लावू...", अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही... : सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्वीट केलंय की,  "आपल्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्यंत संवेदनशील चिमुकलीच्या बलात्कार व हत्येच्या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. अशा अमानुष कृत्यांना समाजात कोणतीही जागा नाही. प्रत्येक महिला व मुलीची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, अशा गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईचा निर्धार कायम राहील. न्याय मिळाला, पण अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी समाज आणि प्रशासनाने एकत्रितपणे अधिक सजग राहण्याची गरज आहे. बलात्कार आणि हत्येसारख्या अमानुष गुन्ह्यांना कोणतीही माफी नाही. न्यायालयाने दिलेला निर्णय हा न्यायव्यवस्थेवरील विश्वास बळकट करणारा आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपले सरकार कटिबद्ध असून, अशा नरधमीवृत्तीच्या गुन्हेगारांविरोधात कठोरात कठोर कारवाई सुरूच राहील..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Pune Nasrapur Case Result: भीमराव कांबळे आता फासावर चढा, न्यायाधीशांनी ठणकावलं; नसरापूर प्रकरणी मोठा निर्णय, कोर्टात काय काय घडलं?