Panyane Petla Vanva Marathi Play: आज आपण सहजपणे पाणी पितो. मात्र, एक काळ असा होता की केवळ जन्माच्या आधारावर लाखो लोकांना सार्वजनिक पाण्यालाही स्पर्श करण्याचा अधिकार नव्हता. त्या सामाजिक अन्यायाविरुद्ध 20 मार्च 1927 रोजी महाड इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे सत्याग्रह उभारला. हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नव्हता, तर मानवी प्रतिष्ठा, समानता आणि स्वाभिमानासाठी पेटलेला लढा होता.

Continues below advertisement

या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त 'पाण्याने पेटला वणवा' हे ऐतिहासिक मराठी नाटक येत्या 23 जून रोजी रंगभूमीवर येणार आहे. यशवंतराव नाट्यमंदिर माटुंगा येथे रात्रौ 8 वाजता या नाटकाचा  शुभारंभाचा प्रयोग रंगणार आहे.  या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच संपन्न झाली.  

'इतिहास केवळ स्मरणात ठेवण्यासाठी नसतो, तर त्यातून वर्तमानाला दिशा मिळावी यासाठी असतो. महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा विचार आणि त्यामागील सामाजिक जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हे नाटक साकारल्याचे लेखक राजकुमार बडोले यांनी सांगितले.

Continues below advertisement

महाडचा चवदार तळे सत्याग्रह हा केवळ इतिहासातील एक प्रसंग नसून सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रेरणास्थान आहे. 'पाण्याने पेटला वणवा' च्या माध्यमातून त्या संघर्षाची तीव्रता आणि त्याचा आजच्या समाजाशी असलेला संबंध प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे दिग्दर्शक प्रशांत निगडे सांगतात. 

युगंधर क्रिएशन्स एल.एल.पी. प्रस्तुत  पाण्याने पेटला वणवा या नाटकाची निर्मिती शारदा राजकुमार बडोले यांनी केली असून गणेश कृ. मोडक हे सहनिर्माते आहेत. नाटकाचे लेखन आणि गीतरचना आमदार तथा महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे आहेत.  दिग्दर्शन प्रशांत निगडे यांनी केले आहे. मंदार देशपांडे यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे.

या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात दोन कालखंडांचा प्रभावी संगम घडविण्यात आला आहे. एका बाजूला महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचा इतिहास उलगडत जातो, तर दुसऱ्या बाजूला त्या इतिहासाकडे पाहणारी आजची पिढी दिसते. शंभर वर्षांपूर्वीच्या संघर्षाचा अर्थ आजच्या समाजासाठी काय आहे, हा महत्त्वपूर्ण प्रश्न हे नाटक प्रेक्षकांसमोर उभा करते.

या नाटकात शशांक पांचाळ, अजित रांजणे, मयुरेश मढवी, अमोल जाधव, प्रेम जेटीथोर, प्रांजल परब, सायली नंदा, राजू भिलारे, तेजस राजे, मयुरी निकम, महादेव जाधव आणि मृणाल खिस्मतवार हे कलाकार विविध भूमिका साकारणार आहेत.