पुणे : तुम्ही जर सोशल मीडिया वापरत असाल तर ही बातमी आवर्जून वाचा. नोकरदार तरुणाई सेक्सटॉर्शनची शिकार होत असल्याची धक्कादायक बाब वारंवार समोर येतेय. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून फसवणूक करुन ते व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. पुणे सायबर पोलिसांत या संदर्भात दोन गुन्हे तर 150 तक्रारी दाखल झाल्यानं खळबळ उडालीय. 


पुण्यातील शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी एक तरुण तक्रार देण्यासाठी आला होता. तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, लॉकडाऊन काळात घरी असताना फेसबुकवरुन एका मुलीची त्याला फ्रेन्ड रिक्वेस्ट आली होती. त्यांच्यानंतर थेट व्हॉटसअॅप नंबर शेअर झाले आणि हळूहळू व्हिडीओ कॉलवर बोलणं होऊ लागलं. नंतरच्या काळात त्या मैत्रिणीने याला नग्न होण्यास सांगितलं. यानेही प्रतिसाद दिला. नंतर थेट तोच व्हिडीओ व्हॅट्सअॅपला येऊन धडकला आणि पैश्याची मागणी होऊ लागली. 


पैसे देण्यास नकार दिल्यास तुझ्या फ्रेंड लिस्टमध्ये असलेल्या प्रत्येकाला हा व्हिडीओ शेअर करेल असा दमही भरला. हे फक्त याच तरुणाच्या बाबत घडलं नाही तर पुण्यात 150 हून अधिक जणांच्या बाबत घडलंय. यामध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलं, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक अशा व्यक्तीचा समावेश आहे. भीती आणि बदनामीमुळे हे पैसे देऊन मोकळे झालेय. पुणे सायबर पोलिसांनी याची गंभीरतेने दखल घेतलीय. दोन आरोपींच्या मागावर असून लॉकडाऊन संपताच दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान येथे कारवाईसाठी जाणार आहे.


काय काळजी घ्याल?



  • अनोळख्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका

  • परिचित नसल्यास व्हॅटसअॅप कॉलवर संवाद साधू नका

  • व्हिडीओ, छायाचित्र पाठवतांना विचार करा

  • चुकीचं काही घडत असल्यास कुटुंबातील व्यक्तीला, मित्र-मैत्रिणीला किंवा पोलिसांशी संवाद साधा.


मनोरंजन किंवा कामाच्या निमित्ताने सोशल माध्यमांचा वापर बघून सायबर गुन्हेगार तुमच्यावर पाळत ठेवतात. तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर तुम्ही त्यांच्या जाळ्यात अडकतात आणि सेक्सटॉर्शनचे शिकार बनतात. त्यामुळे काळजीपूर्वक सोशल मीडियाचा वापर करा.


नागपूरमध्येही सेक्सटॉर्शनचे गुन्हे दाखल
नागपूर पोलिसांकडेच गेल्या काही आठवड्यात अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. पीडितांपैकी अनेक लोकं तर फसवणूक झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे पोलिसांना तापसाआधी अशांना शांत करून त्यांची समजूत काढावी लागली. पोलिसांनी सर्व प्रकरणात गुन्हे दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. मात्र, हे सायबर गुन्हेगार आणि त्यांच्या सोबतच्या तरुणी कुठे तरी लांब बसून हे खेळ खेळत असल्याने अद्यापपर्यंत कोणीही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.