Pune crime: पुण्यातील स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असताना वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने पोलिसांना फोन करत इथे बलात्काराची घटना घडल्याचा कॉल केला आणि मोठी खळबळ उडाली.(Pune Crime) हेल्पलाइन क्रमांकावर आलेल्या या कॉलमुळे तातडीने स्थानिक पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी धाव घेतली. मात्र तिथे गेल्यावर कळले की एका मद्यपीने दारूच्या नशेत पोलिसांना फोन करत खोटी माहिती दिली होती. अत्याचाराची घटना घडली नाही कळल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला खरा. नंतर विचारपूस केली असता, या व्यक्तीने पोलिसांना कॉल केल्याचे कबूल केले. त्यावेळी दारूच्या नशेत असल्याने या व्यक्तीला बोलताही येत नव्हते पोलीस हेल्पलाइन क्रमांकावर दिशाभूल करणाऱ्या व्यक्ती विरोधात त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. रविवारी (9 मार्च) दुपारी पावणेतीनच्या सुमारास ही घटना घडली. (Pune Police)
श्रीनिवास नारायण अकोले असे गुन्हा दाखल झालेल्या 42 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती रामनगर वारजे भागाचा रहिवासी आहे. हेल्पलाइन क्रमांकावर दारूच्या नशेत फोन करून इथे बलात्कार झालाय, अशी खोटी माहिती त्याने पोलिसांना दिल्याने मोठी खळबळ उडाली होती.
नक्की झाले काय?
स्वारगेट एसटी स्थानकातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच रविवारी दुपारी पावणेतीन च्या सुमारास वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात 112 आपत्कालिक हेल्पलाइन दूरध्वनी खणाणला. पोलिसांनी तात्काळ फोन उचलला तसा समोरून 'हॅलो.. इथे बलात्कार झालाय..' अशी माहिती एका व्यक्तीने दिली अन पोलीस ठाण्यात एकच धावपळ उडाली. स्थानिक पोलिसांसह वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत कायगडे, निरीक्षक निलेश बडाख, व अन्य अधिकारी व अंमलदारांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोहोचताच पोलिसांनी माहिती दिलेल्या तक्रारदाराचा श्रीनिवास अकोले या व्यक्तीस मोबाईल वरून संपर्क साधला. अकोले या व्यक्तीने आपणच पोलिसांना कॉल केल्याचे कबूल करत घटनास्थळीच असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर तो दारूच्या नशेत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडे घटनेविषयी विचारपूस केली असता तो अडखळत बोलत असल्याने घटनेबाबत ठोस माहिती देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक नागरिकांकडे व परिसरातील इतर लोकांकडे कसून चौकशी केली. मात्र परिसरात कोणतीही अशी घटना घडली नसल्याचे स्पष्ट झाले. अकोले या व्यक्तीने 112 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना खोटे माहिती दिल्याचे तपासांती उघड झाले. एखाद्या आपत्कालीक स्थितीत पोलिसांची तात्काळ मदत मिळवण्यासाठी 112 क्रमांक वापरला जातो. विनाकारण त्रास होईल अशी माहिती असतानाही या व्यक्तीने पोलिसांची दिशाभूल केल्याने तसेच नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या तातडीच्या सेवेचा गैरवापर केल्याच्या कारणाने वारजे पोलिसांनी या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार अमोल सुतकर यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खोटी माहिती दिल्याची तक्रार केल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा: