Pune Crime: पोलीस भरतीचं स्वप्न उराशी बाळगून कसून मेहनत करण्यासाठी तळजाई टेकडीवर आलेल्या 'भावी' पोलीसांना तुमची लायकी आहे का पोलीस होण्याची असं धमकावत जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरलही झाला. आता या गंभीर प्रकरणात पुणे पोलिसांनी 7 जणांविरोधात खूनाचा प्रयत्न , बेकायदेशीर जमाव जमवणे यांसह गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलातील अधिकारी विकास मेटकरी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. स्थानिक पैलवानांनी ही मारहाण केली असल्याचं समोर येतंय.
नेमकं प्रकरण काय आहे?
पुण्यातील तळजाई टेकडीवर नियमित सराव करणाऱ्या द्यार्थ्यांवर काही गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता.सोमवारी सकाळच्या सुमारास घटना घडली. यामध्ये काही विद्यार्थ्यांना जबर मारहाण करण्यात आली असून, “तुमची लायकी नाही पोलीस होण्याची” अशा अपमानास्पद शब्दांत त्यांना हिणवण्यात आलं. भावी पोलिसांवरच गावगुंडांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
काही स्थानिक पैलवान या मैदानात येऊन सराव करणाऱ्यांना शिवीगाळ करत होते, त्यांच्यावर दडपशाही करत होते, असा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील अधिकारी विकास मेटकरी यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी काही पैलवानांनी त्यांना देखील शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
तळजाई टेकडीवर तरुणांमध्ये भीतीचं वातावरण
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सात जणांची नावे ओळखून गुन्हा दाखल केला असून काही अज्ञात आरोपींचाही समावेश आहे. घटनेनंतर तळजाई टेकडी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, सरावासाठी येणारे अनेक तरुण-तरुणी घाबरत आहेत. पोलीस भरतीसाठी कठोर परिश्रम करणाऱ्या उमेदवारांवर असे हल्ले होणं अत्यंत धक्कादायक असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. दरम्यान, आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सहकारनगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा: