Pune Crime News : 'विद्येचे माहेर घर' , 'पुणे तिथे काय उणे' असं आपण पुण्याबाबत नेहमी बोलत असतो. किंबहूना त्याचा प्रत्ययही आपण वेळोवेळी घेत असतो. मात्र पुण्यात अशीच एक चोरीची घटना उजेडात आल्याने  'पुणे तिथे काय उणे' हेच साऱ्यांच्या तोंडी येऊ लागले आहे. कारण पुण्यात चक्क दाजीनेच मेव्हण्याच्या घरी चोरी करत घरातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचा (Crime News) प्रकार समोर आला आहे. या धाडसी चोरीत घरातील लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली असून या घटनेने सर्वत्र एकच  खळबळ उडाली आहे.

घरातून 2 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज लंपास  

दरम्यान, पुढे आलेल्या माहितीनुसार 7 जुलै रोजी ही घटना घडली असून घरातील मंडळी सकाळी कामाला गेले असताना ही चोरी झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. घटनेच्या दिवशी तक्रारकर्ते आणि त्यांचे कुटुंबातील सर्व जण त्यांच्या बहिणीच्या घरी गेले होते. त्यानंतर ते सायंकाळी साडेसहा वाजता सर्व जण घरी परतले. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपल्या घरी चोरी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्या घरातून 2 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीने त्याच्या घरात चोरी झाल्याची तक्रार दिली.

....अन् दाजीचं पितळ उघडं पडलं 

दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पाहणी केली. यावेळी घरातील एकूण परिस्थिती पाहिली असता घराची माहिती असलेल्या व्यक्तीनेच हे कृत्य केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आला. पुढे तपासात पोलिसांना एक व्यक्ती अश्रफनगर येथे थांबला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव रोहेल शेख असून हा तक्रारकर्त्याच्या बहिणीचा पती निघाला. त्यालाच त्यांच्या घरीची पूर्ण माहिती असून तो कायम येत जात असताना त्याने घराच्या कुलूपाच्या चाव्या देखील घेतल्या होत्या. तक्रारकर्ते बहिणीच्या सासरी आले असताना दाजीने घरी जाऊन चोरी केली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात दाजीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेले 2 लाख 46 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा 2 लाख 46 हजार रुपयांचा ऐवज काढून दिला.

इतर महत्वाच्या बातम्या