Pune Crime News: पुण्यातील आयटी हब आणि पब संस्कृतीवर पोलिसांची करडी नजर असताना, आता शहराबाहेरील ग्रामीण भागात सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल बेकायदेशीर पार्टीचा (Illegal Party) पुणे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील तुळापूर परिसरातील एका आलिशान बंगल्यात आयोजित 'प्रोजेक्ट एक्स' या हाऊस पार्टीवर पुणे गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) छापा टाकला. या प्रकरणी पोलिसांनी तब्बल 78 जणांवर गुन्हा दाखल केला असून तो अलिशान बंगला सील केला आहे.

Continues below advertisement

या कारवाईदरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन झाल्याचे उघड केले आहे. रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यासाठी वापरण्यात आलेली तब्बल 1 कोटी 4 लाख रुपयांची डीजे साऊंड सिस्टिम (DJ Sound System) पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच, पार्टीत बेकायदेशीरपणे विदेशी मद्याची विक्री आणि सेवा केली जात होती, तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे 10 लाख रुपयांचे विदेशी मद्य (Foreign Liquor) हस्तगत केले आहे.

Pune Crime News: 23 जणांचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीला

या हायप्रोफाईल पार्टीमध्ये अमली पदार्थांचा (Drugs) वापर झाल्याचा तीव्र संशय पोलिसांना आहे. कारवाईदरम्यान अनेक तरुण-तरुणी नशेच्या अवस्थेत आढळून आल्याने, त्यापैकी संशयास्पद वाटणाऱ्या २३ जणांचे रक्ताचे नमुने (Blood Samples) चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सध्या फॉरेन्सिक अहवालाची (Forensic Report) प्रतीक्षा असून, रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार आणखी गंभीर कलमे वाढवली जाण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

Pune Crime News: पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची प्रतिक्रिया

या संपूर्ण धडक कारवाईवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांनी सविस्तर माहिती देत कडक इशारा दिला आहे. पार्टी आयोजित करताना कायद्याचे आणि प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. पुणे पोलिसांचे पब, बार आणि हॉटेल्सवर सातत्याने लक्ष असताना, शहरापासून दूर असलेल्या आलिशान बंगल्यांमध्ये अशा प्रकारच्या पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आयोजक आणि संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. 

पुणे गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, शहराच्या बाहेरील भागात एका आलिशान बंगल्यात मोठ्या प्रमाणात पार्टी आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. कारवाईदरम्यान पार्टीस्थळी विदेशी मद्य, हुक्का साहित्य तसेच गांजा आढळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. पार्टीमध्ये वापरण्यात आलेले डीजे साऊंड सिस्टिम आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. संबंधित बंगला सील करण्यात आला असून मोठ्या प्रमाणात विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. या पार्टीसाठी विविध शहरांमधून आणि इतर राज्यांमधून तरुण-तरुणी आले होते. त्यामध्ये बेंगळुरू, इंदूर, दिल्ली आणि राजस्थान येथील व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

अमितेश कुमार पुढे म्हणाले की, अनेक जण विमानाने तसेच आलिशान वाहनांमधून या ठिकाणी पोहोचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पार्टीचे आयोजन, आर्थिक व्यवहार आणि सहभागी व्यक्तींची भूमिका याबाबत चौकशी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.  

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?